धारणी,
tiger-sighting : मेळघाटातील धुळघाट रेल्वे आणि बारुखेडा या दोन गावा दरम्यान दररोज पट्टेदार वाघाचे दर्शन पर्यटक व प्रवाशांना होत आहे. मदमस्तपणे वाघोबा चालताना लोकांना दिसला खरा, मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचार्यांचे दुर्लक्ष वाघासाठी धोकादायक होऊ शकते.
धारणी ते अकोट मार्गावर रेल्वे धुळघाट ते बारुखेडा (उजाड) दरम्यानच्या जंगलात मोठ्या आरामाने शतपावली करताना वाघाचे दर्शन अनेकांना झाल्याने अकोट प्रवास धोक्याचा झालेला आहे. धारणी तालुक्यातून अकोट, तेल्हारा, शेगाव जाण्यासाठी धुळघाट-झरी मार्ग जवळचा मानला जातो. या मार्गानेच अकोट बाजारासाठी किंवा दवाखान्यासाठी लोक जातात. रेल्वे धुळघाट दरम्यान असलेले रेल्वे तलई गाव आता उजाड असून बारुखेडा पण पुनर्वसित झाल्याने हा भाग वन्य जीवांसाठी स्वर्ग ठरत आहे.
बारुखेडाजवळ एक नाला असून वन्य प्राण्यांचा संचार येथे नियमित असतो. अकोट, हिवरखेड आणि झरी जाणार्यांनी वाघाला निर्भेळपणे फिरताना पाहिले. दररोज वाघ दिसत असला तरी मेळघाटवाल्यांनी प्रवास करणे सोडलेले नाही. चार चाकी वाहनांनी प्रवास करणारे तर चक्क व्हिडीओ काढत आहेत.
धुळघाट ते अकोट मार्गावर दरम्यान असलेल्या बारुखेडा व झरी या दोन भागाच्या जंगलात सतत वाहनांची वर्दळ असते तर वन्य प्राणी पण मोठ्या संख्येत असतात. व्याघ्र प्रकल्पाच्या धुळघाट व वान या वनपरिक्षेत्रात सांबर, बिबट, अस्वल, हरिण दिसणे काही नवल मानले जात नाही. मात्र, आता वाघ दररोज एकाच मार्गावर दिसत असल्याने वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका संभव आहे. वाघ जरुर फिरत आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी जंगलातून फिरत नसल्याने अनुचित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.