100 सांगितले 500 आले ...एटीएममध्ये ‘पैशांचा सुसाट फवारा’

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई
Vasai ATM वसईत एका एटीएममध्ये घडलेल्या अनोख्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोलानी नाका परिसरातील हिताची एटीएममध्ये शनिवारी रात्री झालेल्या या प्रकारात ग्राहकांनी मागितलेल्या रकमेपेक्षा अनेक पटीने जास्त पैसे मशीनमधून बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले.
 

Vasai ATM 
मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने 100 रुपये काढण्याची विनंती केली असता एटीएममधून थेट 500 रुपये बाहेर आले, तर खात्यातून फक्त 100 रुपयांचीच डेबिट नोंद दिसत होती. दुसऱ्या एका व्यवहारात 400 रुपये काढण्याची विनंती केल्यावर तब्बल 2000 रुपये मिळाल्याचेही समोर आले. या प्रकारामुळे एटीएम वापरण्यासाठी आलेले ग्राहक काही काळ संभ्रमात पडले.ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच एटीएमबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली. अनेकांनी हा अनुभव स्वतः घेण्याचा प्रयत्न केला असून काहींनी अधिक रक्कम काढल्याचेही समोर आले आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत एटीएममधील व्यवहार बंद केले आणि जमाव पांगवला.या घटनेनंतर संबंधित बँक आणि तांत्रिक विभागाला Vasai ATM  माहिती देण्यात आली असून मशीनची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत एटीएम सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ वसई परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असले तरी बँक प्रशासनाने तातडीने कारवाई करत संभाव्य आर्थिक गैरव्यवहार टाळल्याचेही सांगितले जात आहे. आता हा एटीएम बिघाड दुरुस्त झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.