पराभव तरीही चाहत्यांना सीएसकेचा सलाम! VIDEO

    दिनांक :19-May-2026
Total Views |
चेन्नई,
CSK salutes the fans आयपीएलच्या एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी सामन्यानंतरचा क्षण मात्र चाहत्यांच्या मनात कायम राहणारा ठरला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर एमएस धोनीसह संपूर्ण सीएसके संघाने मैदानावर उतरून प्रेक्षकांचे आभार मानत भावनिक वातावरण निर्माण केले.या सामन्यात धोनीच्या खेळण्याबाबत उत्सुकता होती, मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी स्पष्ट केले की धोनी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्यामुळे तो मैदानात उतरू शकला नाही. त्यामुळे हजारो चाहत्यांची अपेक्षा भंग झाली. तरीही धोनीने संघासोबत उपस्थित राहून चाहत्यांशी संवाद साधत त्यांचे मन जिंकले.
 
 
 
CSK salutes the fans dhoni
 
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने सात विकेट्स गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १९ षटकांत पाच विकेट्स गमावत १८१ धावा करत सामना आपल्या नावावर केला.पराभवानंतरही सीएसकेच्या खेळाडूंनी मैदान सोडण्याआधी स्टेडियमभोवती फेरी मारत प्रेक्षकांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले. धोनीचा हसरा चेहरा आणि संघाचा हा भावनिक निरोप चाहत्यांसाठी खास क्षण ठरला. अनेक चाहत्यांनी हा क्षण मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान, या पराभवानंतर सीएसके गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असून त्यांच्या खात्यात १२ गुण आहेत. संघाने १३ सामन्यांत सहा विजय मिळवले असून सात पराभव स्वीकारले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजूनही कायम असली तरी ती अधिक कठीण झाली आहे. पुढील सामना गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.