केकेआरच्या जाळ्यात हार्दिक?

व्हायरल फोटोमुळे तर्कवितर्क सुरू

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई,
Hardik to join KKR. आयपीएल २०२६ हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याने त्याच्यावर टीका होत असतानाच आता त्याच्या भवितव्याबाबत मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे हार्दिक पुढील हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघ सरावासाठी मैदानावर उतरले होते. यावेळी हार्दिक पंड्या केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी चर्चा करताना दिसला. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर हार्दिकच्या संभाव्य ट्रेडबाबत तर्कवितर्क सुरू झाले.
 
Hardik to join KKR
 
 
यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे हार्दिकला सलग काही सामने मुकावे लागले आहेत. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी संघाचे नेतृत्व केले. मात्र आगामी सामन्यात हार्दिक पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, मुंबई इंडियन्सची यंदाची मोहीम निराशाजनक ठरली आहे. संघाला १२ सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकता आले असून प्लेऑफच्या शर्यतीतून त्यांचा जवळपास पत्ता कट झाला आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी संघात मोठे बदल होण्याची चर्चा रंगू लागली आहे.
 
 
हार्दिक आणि अभिषेक नायर यांच्या फोटोवर चाहत्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हार्दिकला केकेआरमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तर काही मुंबई इंडियन्स चाहत्यांनी संघात नव्या खेळाडूंना संधी देण्याची मागणी केली आहे. सध्या हार्दिक पंड्या केकेआरमध्ये जाणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी एका फोटोने आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत चर्चांना मात्र चांगलाच रंग चढवला आहे.