निवासस्थान व कार्यालय हाकेच्या अंतरावर, तरीही शासकीय वाहनांचा वापर कायम

अधिकाऱ्यांना पेट्रोल बचतीचे वावडे..?

    दिनांक :19-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
petrol-conservation : देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, अनेक मंत्री, न्यायाधीश तसेच वरिष्ठ अधिकारीदेखील वेळोवेळी पायी चालणे, सायकलचा वापर किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करीत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र पांढरकवडा तालुक्यात याच्या उलट परिस्थिती पहायला मिळत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
 
 
K
 
 
 
तालुक्यातील अनेक शासकीय अधिकाèयांचे निवासस्थान आणि कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही संबंधित अधिकारी शासकीय वाहनांचा वापर करूनच ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी केवळ काही मिनिटांच्या अंतरासाठी देखील वाहनांचा वापर केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
एकीकडे शासन पेट्रोल-डिझेल बचतीसाठी अभियान राबवत आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्तरावर त्याच सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामान्य नागरिकांना सायकल वापरणे, पायी चालणे, इंधन बचत करणे याचे आवाहन केले जाते; मात्र अधिकारी स्वतःच त्याचे पालन करत नसल्याने चुकीचा संदेश समाजात जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
 
 
विशेष म्हणजे पांढरकवडा शहरातील काही कार्यालये आणि शासकीय निवासस्थाने अगदी जवळ असल्याने पायी किंवा सायकलने सहज प्रवास होऊ शकतो. तरीही अनेक अधिकाèयांकडून शासकीय वाहनांचा नियमित वापर होतच असल्याचे चित्र आहे.
 
 
पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. अधिकाèयांनी स्वतः आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे कठोरपणे लागू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
जर वरिष्ठ पातळीवरील नेते, मंत्री आणि न्यायव्यवस्थेतील मान्यवर इंधन बचतीचा संदेश देत असतील, तर स्थानिक प्रशासनानेही त्याचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.