भिवाडी (राजस्थान),
Mother throws acid on toddler भिवाडी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका आईने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला ॲसिड पाजल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर चिमुकलीची प्रकृती अत्यंत खालावली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर अलवर येथील बाल रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार ही घटना भिवाडीतील कॅप्टन चौक परिसरात घडली. सुरुवातीला मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला संध्याकाळी अलवर येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या शरीरात तीव्र संसर्ग आणि रक्तस्त्राव होत असून तिची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तिला सतत श्वास घेण्यास अडचण येत असून ऑक्सिजनची पातळीही स्थिर राहत नाही.

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, बाळाचे नाव काव्या असून ती फक्त आठ महिन्यांची आहे. तिच्यावर अत्यंत गंभीर स्थितीत उपचार सुरू आहेत आणि वैद्यकीय पथक तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.दरम्यान, बाळाच्या वडिलांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, त्यांची पत्नीनेच मुलीला ॲसिड पाजल्याचे त्यांना कळले. कामावर असताना बहिणीचा फोन आल्यानंतर ते तातडीने घरी परतले, तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचे समजले. या घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा तपास सुरू असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.