शब्द वाटू धन, जनलोकां

    दिनांक :19-May-2026
Total Views |
अग्रलेख...
political words शब्द हे शस्त्रासारखे असतात. जर एखाद्या बलवानाने हाती असलेल्या शब्दांचे शस्त्र उगारले तर त्याचा घाव अधिक खोलवर रुततो. ज्यांच्या हाती ते शस्त्र द्यावयाचे तो केवळ बलवान असून चालत नाही, तर शस्त्र चालविण्याची विवेकी विचारशक्ती त्याच्याकडे असावी लागते. शब्दांचे शस्त्र कुठे चालवायचे, केव्हा म्यान करायचे याचे भान राखावे लागतेच; पण काही वेळा गरज नसताना परजलेले शस्त्र अकारण कुठे तरी घाव घालून जाते. म्हणजे, हाती शब्दांचे शस्त्र आहे म्हणून ते वापरलेच पाहिजे असे नाही, याची जाणीव असणे हे अधिक विवेकीपणाचे ठरते. संदर्भाची ताकद असलेले शब्द अधिक प्रभावी ठरतात. संदर्भ आणि शब्द यांचा संबंध लक्षात घेणेही काही वेळा महत्त्वाचे असते. मुळात शब्द स्वभावतः संयमीच असतात. कोणत्याही शस्त्रात ठासून भरले तरी ते स्वतःहून चाल करून जात नाहीत. अगोदर ते विचारांच्या रूपाने मेंदूमध्ये जन्म घेतात. त्यांची कसून छाननी करून मेंदूने त्यांना तेथून बाहेर पडण्याची परवानगी दिली, तरच ते जिभेवर उतरतात. तरीही ते बाहेर पडण्यास सहसा राजी नसतात. एखाद्याची जीभ सैल असेल तरच ते जिभेवरून घसरतात.
 
 

agralekh 
 
 
मग अनेकदा अशा रीतीने घसरल्यामुळे बाहेर पडलेल्या शब्दांचीच पंचाईत होते. कारण बाहेर पडलेला शब्द पुन्हा माघारी येत नसतो. मग सुरू होते शब्दांना सावरण्याची कसरत. नवनवे वादन निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शब्दांचा शस्त्र म्हणून वापर करावयाचा की शब्द हे विचारांची रत्ने आहेत असे समजून त्यांचा सांभाळ करावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. असे करणे हा विवेकीपणा असतो; काही क्षेत्रांत विवेकीपणापेक्षाही शब्दांना खेळविण्यातच मजा मानली जाते. कधी कधी शब्दांची जिभेवरून बाहेर पडण्याची प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली, तरी जीभ जाणीवपूर्वक सैल सोडली जाते आणि शब्दांच्या खेळांची मजा अनुभवल्यानंतर त्यांनाच दोष देत सारवासारव सुरू होते. ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला’, ‘मला असे म्हणावयाचे नव्हते’, ‘मी तर असे बोललोच नव्हतो’’ अशी वाक्ये अलिकडे अधूनमधून कानावर येतात; तो या शब्दांच्या खेळाचाच पुढचा टप्पा असतो. अशा वाक्यांतून शब्दांची विश्वासार्हता तर संपतेच, पण ज्याच्या जिभेवरून ते बाहेर पडलेले असतात, त्यांच्यावरील विश्वासही पणाला लागलेला असतो. विशेषतः राजकारणात शब्दांचा हा ‘बोललो होतो-नव्हतो’ खेळ कमालीचा लोकप्रिय असल्याचे अनेकवार दिसून आले आहे. आधी बेफिकीरपणे शब्द सोडून द्यायचे आणि नंतर त्यांची जबाबदारी झटकून टाकावी, असे राजकारणात अनेकदा घडलेले आहे. काही दशकांपूर्वी, जेव्हा शब्द केवळ कागदावरच टिपून घेतले जायचे, तेव्हा ते मागे घेणे किंवा त्यांची जबाबदारी झटकून टाकणे फारसे कठीण काम नव्हते. आपण असे बोललोच नव्हतो, असे बिनदिक्कतपणे सांगणे सोपे होते. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, असे सांगून बचाव करणारे राजकारणी नेते हे तेव्हा खरेखुरे धुरंधर मानले जात असत. पुढे माध्यमविश्वात प्रगती झाली, तंत्रज्ञानाचा भक्कम आधार माध्यमांना मिळाला आणि जिभेवरून बाहेर पडलेले किंवा शब्दशः ‘घसरलेले’ शब्द साठविण्याची व जतन करून ठेवण्याची सोय झाली. आजही आपल्या जिभेवरून घरंगळत बाहेर पडलेल्या किंवा घसरलेल्या शब्दांची जबाबदारी झटकण्याचे केविलवाणे प्रयत्न होताना दिसतातच. याला सारवासारव करणे असे म्हटले जाते. असे केल्याने शब्दांची विश्वासार्हता डळमळीत झाली, तरी ते उच्चारणाऱ्या जिभांना संरक्षण मिळते असे काही क्षेत्रांत विश्वासाने मानले जाते.
 
गेल्या अनेक वर्षांत अशारीतीने आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांची हत्यारे आपल्यावर उलटल्याचे दिसून आल्यानंतर बचावाचे साधन म्हणून जबाबदारी झटकण्याचे जे प्रकार घडले, त्यामध्ये पुढे कोणतेच क्षेत्र मागे राहिलेले नाही असे दिसते. राजकारणात नेहमी वापरला जाणारा हा बचावाचा उपाय अन्य अनेक क्षेत्रांत वापरला जाऊ लागला आणि जीभ घसरली तरी फारसा फरक पडत नाही, असेही अनेकांस वाटू लागले. आपल्या शब्दांचा वाद निर्माण झाला असे दिसू लागले तरी तोवर ते बोलणाèया व्यक्तीचे मूळ उद्दिष्ट साध्य झालेले असल्याने, विपर्यास झाल्याचे खापर बरेचदा माध्यमांवर फोडले जाते. अध्यात्म क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शास्त्री नावाच्या एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अलिकडेच केलेल्या एका वक्तव्यावरून वाद भडकल्यानंतर सारवासारवीचा हाच उपाय वापरला होता, हे अनेकांस आठवत असेल. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून मोडतोड केलेले वक्तव्य प्रसृत करण्यात आले, हाच बचाव त्यांनीही केला होता. आपल्या वक्तव्याची केवळ एकच बाजू दाखवून विपर्यास केला गेला, असा बचावही काहींनी केल्याची उदाहरणे आहेत. आपल्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो असे सांगत लोकांचा विश्वास जपण्याचे व सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न काही करतात. आता माध्यमांसमोर व्यक्त केलेल्या विचारांची जबाबदारी टाळली तर पुराव्यानिशी ती माथी मारलीच जाते हे स्पष्ट होऊ लागल्यामुळे राजकीय क्षेत्रातील कोणासही अशी वक्तव्ये करताना अनेकदा विचार करावा लागत असल्याने, अशी काही वादग्रस्त वक्तव्ये कुणी केलीच, तर जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा त्यामागे हेतू असावा, असा समाजाचा समज पक्का होत असतो, हे लक्षात घेऊन वक्तव्ये करताना भान ठेवावे लागतेच, पण अशा वक्तव्यांची खरोखरीच मोडतोड किंवा विपर्यास झाला असेल, तर तसे करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटत असते.
 
असा मोठा नाजूक आणि संवेदनशील काळ सध्या आलेला असल्याने कोणतेही वक्तव्य केल्यानंतर त्यांचे बरे-वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणारच, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. कारण अशा वक्तव्यांतून निर्माण होणाèया विश्वासार्हतेवरील प्रश्नचिन्हे केवळ त्या व्यक्तीभोवती केंद्रित न राहता त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यवस्थेवरही उमटत असतात. राजकीय नेत्यांच्या अशा सवयीमुळे संपूर्ण राजकारणाच्या विश्वासार्हतेवर उमटलेली प्रश्नचिन्हे आपण अनेकदा पाहिली आहेत. चित्रपटसृष्टीतील वक्तव्यांकडे तर कुजबुज किंवा गॉसिप म्हणूनच पाहिले जात असल्याने त्यांची विश्वासार्हता शंकास्पदच असते, हे समाजानेही स्वीकारलेले आहे. म्हणूनच ज्या व्यवस्थांकडे विश्वासाने पाहिले जाते अशा व्यवस्थांमध्ये अशा वक्तव्यांना जागा असू नये, अशी समाजाची अपेक्षा असते. न्यायव्यवस्थेविषयी ही अपेक्षा काहीशी अधिक असते. कारण ही व्यवस्था संपूर्णपणे समाजाच्या विश्वासावर उभी राहिलेली असते. इथे उमटणारा प्रत्येक शब्द हा अंतिम असतो, अशी समाजाची श्रद्धा असते आणि अशा प्रत्येक शब्दाला न्याय मानून तो स्वीकारण्याची समाजाची मानसिकताही असते. न्यायव्यवस्थेतील शब्द हे केवळ शस्त्रे नव्हेत तर रत्ने असतात. शब्द हा देव असतो, अशी आपल्या संतांची शिकवण आहे. शब्द हेच जिवांचे जीवन असते, ते वाटल्यास वाढतात, असे संतपरंपरा मानते.political words याच संतपरंपरेचे पाईक असलेल्या समाजात शब्दांची ही महती मान्य असल्यामुळे त्यांची पूजा केली जाते. म्हणून ज्या व्यवस्थांमध्ये शब्द हे प्रमाण असते, तेथे विपर्यासास वाव असता नये.
 
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे उफाळलेल्या वादातून पुन्हा एकदा शब्दांच्या पावित्र्याची कसोटी लागणार आहे. विधि क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बनावट पदव्या मिळविल्या जात असल्याच्या मुद्यावर चिंता व्यक्त करताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी वापरलेल्या काही कथित शब्दांवरून गदारोळ माजला आणि त्यावर स्पष्टीकरण करण्याची वेळ सरन्यायाधीशांवर आली. आजचा तरुण हा विकसित भारताचा आधारस्तंभ आहे; त्याचा मला अभिमान आहे, असा खुलासा करताना, आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याची खंत त्यांना व्यक्त करावी लागली. न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या तोंडून उमटलेले कथित शब्द वादग्रस्त ठरून त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटल्याने पुन्हा एकदा शब्दांचा वापर करण्याच्या विवेकाचा मुद्दा ऐरणीवर आलाच आहे. न्यायालयीन प्रक्रियेत आणि लोकशाहीत न्यायाधीशांच्या वक्तव्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. न्यायाधीशांनी युक्तिवादादरम्यान नोंदविलेली तोंडी निरीक्षणे अनेकदा चर्चेचा मुद्दा ठरतात आणि त्याचे सामाजिक पडसादही उमटतात. कारण अशा वक्तव्यांचे परिणाम केवळ तात्कालिक न राहता, व्यवस्थेच्या तटस्थ प्रतिमेवरही होत असतात. वस्तुतः ही वक्तव्ये म्हणजे निवाडा नसतो; तथापि त्याची नोंद घेतली जात असते. काही वक्तव्ये केवळ वैयक्तिक मतप्रदर्शन नव्हे, तर संविधानाच्या चौकटीच्या मर्यादा दाखविणारी असतात. म्हणूनच या व्यवस्थेतील शब्द हे शस्त्रे नव्हे तर रत्ने असतात. समाजाच्या मनात असलेली ही भावना संवेदनशीलतेने जपली गेली पाहिजे इतकेच!
---