बुलढाणा,
Raipur ATS Conducts Raids in Buldhana बुलढाणा जिल्ह्यात रायपूर पोलिस आणि अकोला एटीएसच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा उघडकीस आणला आहे. चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी गावात गोपनीय माहितीच्या आधारे ही रेड टाकण्यात आली. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 7 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा शस्त्रसाठा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, चार मॅगझीन, 92 जिवंत काडतुसे, दोन वापरलेली काडतुसे, एक लोखंडी चाकू, महिंद्रा कंपनीची XUV500 कार तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या सर्व जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 7,05,000 रुपये इतकी आहे.

या प्रकरणात शुभम सागर पवार (रा. कारला चौक, वर्धा), रुपेश मिलन शिंदे आणि रोहेल मिलन शिंदे (दोघेही रा. हसनाबाद, जालना) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात या आरोपींकडे शस्त्रसाठा बेकायदेशीरपणे बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके, पोलीस कर्मचारी दशरथ शितोळे, ज्योती गलबले, राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे आणि चालक सागर कोरडे तसेच अकोला एटीएसच्या पथकाने संयुक्तपणे सहभाग घेतला. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.