वेध. . .
नितीन शिरसाट
tree in mothers name दरवर्षी वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, संवर्धन आणि हरित क्रांतीला चालना देण्यासाठी राज्यभरातील प्रशासन, विविध संघटना, शाळा व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येतात. पावसाळ्याच्या प्रारंभी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला बचतगट, निसर्गप्रेमी, युवक मंडळांच्या सहभागातून गावोगावी वृक्षलागवड केली जाते. यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासही मदत होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विशेष उपक्रम घेतले जातात. एक विद्यार्थी एक झाड, माझे झाड माझी जबाबदारी, एक पेड माँ के नाम यांसारख्या मोहिमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष झाडे लावण्यास प्रोत्साहन दिले जाते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडांची नियमित निगा राखण्याची जबाबदारीही दिली जाते. त्यामुळे लहान वयातच पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण होत आहे. ग्रामपंचायतींकडून गावातील सार्वजनिक जागा, स्मशानभूमी परिसर, रस्त्यांच्या बाजूची जागा, शाळा परिसर, शेतरस्त्यांवर वृक्षारोपण केले जाते. सकाळी भ्रमंतीला जाणाऱ्या महिला व निसर्गप्रेमी नागरिकांकडून विविध बियांचे जंगल परिसरात रोपण केले जाते. काही गावांमध्ये ग्रामसभेत विशेष ठराव करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात येते.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, केवळ झाडे लावणे पुरेसे नाही. त्यांचे संगोपन महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक शाळा व ग्रामपंचायती आता वृक्षसंवर्धन या संकल्पनेवर भर देत आहेत. झाडांना नियमित पाणी देणे, जनावरांपासून संरक्षण करणे, मृत झालेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावणे याकडे लक्ष दिले जात आहे. ग्रामीण भागात पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ ठरत आहेत. राज्यात विविध राज्य मार्गांच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असताना अनेक ठिकाणी रस्त्यालगतची जुनी व शेकडो वर्षांची वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रस्ते सुरक्षितता व वाहतूक सुलभतेसाठी रुंदीकरण गरजेचे असले तरी पर्यायी वृक्षारोपण, वृक्षांचे पुनर्स्थापन, कमी प्रमाणात वृक्षतोड यावर भर देण्याची मागणी होत आहे. तोडण्यात येणाऱ्या प्रत्येक वृक्षाच्या बदल्यात अनेक नवीन झाडे लावण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. धाराशिव जिल्ह्यात ‘एक पेड माँ के नाम’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राबविण्यात आलेल्या या मोहिमेची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर जिल्ह्याचे नाव राज्यभर चर्चेत आले. प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून हा विक्रम घडविण्यात आला. मात्र विक्रमाची नोंद झाल्यानंतर आता या झाडांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे. आईच्या नावाने एक झाड हा भावनिक संदेश देत हजारो नागरिकांना या उपक्रमाशी जोडण्यात आले. शासनाच्या विविध विभागांनी लक्ष्य निश्चित करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, शाळा, मोकळी मैदाने, रस्त्यांच्या कडेला आणि गाव परिसरात झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणावेळी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीही करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी लावलेली झाडे कोमेजल्याचे चित्र समोर येत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये झाडांना पाणी मिळत नसल्याने अनेक रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी झाडांभोवती संरक्षक जाळी नाही, तर काही ठिकाणी जनावरांमुळे रोपांचे नुकसान झाले आहे. राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. हा आयोग पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी व्यापक लोकचळवळ म्हणून काम करेल.
राज्यातील वनाच्छादन वाढवण्यासाठी, वृक्षारोपण मोहिमेचे नियोजन करण्यासाठी महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय वन धोरणानुसार, कोणत्याही राज्याचे किमान 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे.tree in mothers name महाराष्ट्राचे सध्याचे वनाच्छादन 21.25 टक्के असून ते 33 टक्क्यांपर्यंत नेण्याचे मोठे उद्दिषष्ट आयोगाला दिले आहे. केवळ वृक्षारोपणच नाही तर लावलेली झाडे जगवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही या आयोगाची मुख्य जबाबदारी असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील हा आयोग राज्याच्या पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा देणार आहे.
9881717828