‘थाला’ पुन्हा दिसणार का? चेन्नईत भावनांचा महापूर

    दिनांक :19-May-2026
Total Views |
चेन्नई,
Will Thala be seen again चेन्नई सुपरकिंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर एमएस धोनीच्या आयपीएल भविष्याबाबत चर्चांना पुन्हा वेग आला आहे. दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात धोनी एकही सामना खेळू शकलेला नाही. मात्र चेपॉकवरील शेवटच्या सामन्यात तो मैदानात उतरेल, अशी चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. हजारो चाहत्यांनी स्टेडियम खचाखच भरले होते, पण धोनी खेळला नाही आणि चेन्नईला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.सामना संपल्यानंतर धोनीसह संपूर्ण सीएसके संघाने मैदानाला फेरी मारत चाहत्यांचे अभिवादन केले. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. अनेकांना हा धोनीचा चेपॉकवरील शेवटचा क्षण असल्याचे वाटले. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
 
 
dhoni retirement
 
दरम्यान, सीएसकेचा माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक सुरेश रैनाने धोनीच्या भवितव्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत रैनाने सांगितले की, त्याने धोनीला पुढील वर्षीही आयपीएल खेळण्याची विनंती केली. त्यावेळी धोनीने आपले शरीर आता साथ देत नसल्याचे सांगितले, मात्र रैनाने त्याला अजूनही खेळण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. रैनाच्या मते, धोनीचा दृष्टिकोन सकारात्मक असून संघालाही तो पुढच्या हंगामात खेळावा असे वाटत आहे.याचदरम्यान, सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही धोनीच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा निर्णय असेल. फ्लेमिंग म्हणाले की, धोनी मैदानात उतरला नसला तरी त्याची उपस्थिती संघासाठी अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. विशेषतः युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यामध्ये त्याची भूमिका मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले. फ्लेमिंग यांनी पुढे सांगितले की, संघाने यंदा काही नव्या खेळाडूंना संधी दिली असून भविष्यात ते सीएसकेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र अखेरीस संघाचे मूल्यमापन निकालांवरच होते आणि त्यामुळे पुढील निर्णय व्यवस्थापनावर अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.धोनीच्या निवृत्तीबाबत अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी चाहत्यांमध्ये पुढील हंगामातही ‘कॅप्टन कूल’ मैदानात दिसेल, अशी आशा कायम आहे.