पंजाब,
Inder Kaur murder पंजाबी संगीतविश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायिका इंदर कौर उर्फ यशइंदर कौर हिची हत्या झाल्याची माहिती समोर आली असून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गायिकेचा मृतदेह कालव्यात आढळून आला आहे. या घटनेमुळे पंजाबसह संपूर्ण संगीतविश्वात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून तिला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदर कौर 13 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरातून कारने बाहेर पडली होती. काही सामान घेण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी शोधाशोध करूनही तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर 19 मे रोजी सकाळी एका कालव्यात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांना बोलावले असता तो मृतदेह इंदर कौर हिचाच असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात कुटुंबीयांनी Inder Kaur murder गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुखविंदर सिंह उर्फ सुक्खा नावाचा व्यक्ती इंदर कौरवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र इंदरने लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने तिचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केली. आरोपीने हा कट पूर्वनियोजित पद्धतीने रचल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, आरोपी सुखविंदर सिंह हा कॅनडामधून नेपाळमार्गे पंजाबमध्ये आला होता आणि गुन्हा केल्यानंतर पुन्हा कॅनडाला पळून गेला.दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 15 मे रोजीच सुखविंदर सिंह आणि त्याचा साथीदार करमजीत सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र वेळेत कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.जमालपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ बलबीर सिंह यांनी सांगितले की, कालव्यात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे पंजाबमधील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.