रोम,
Modi gifts Melody toffee to Melonies भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचा विषय ठरली ती मोदींनी मेलोनी यांना दिलेली भारतातील प्रसिद्ध ‘मेलोडी’ टॉफी. मेलोनी यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या खास भेटीसाठी मोदींचे आभार मानले आहेत.व्हिडिओमध्ये जॉर्जिया मेलोनी यांनी ‘मेलोडी’ टॉफीचे कौतुक करत ती “खूपच स्वादिष्ट” असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटिझन्समध्येही याची चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात इटलीची राजधानी रोम येथे पोहोचले होते. रोममध्ये मेलोनी यांनी त्यांचे विशेष स्वागत केले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता अधिक मजबूत होत असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी नमूद केले. पारंपरिक मैत्रीपलीकडे जाऊन दोन्ही देशांमध्ये आता विशेष सामरिक भागीदारी विकसित होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोदींनी दिलेल्या छोट्याशा पण खास भारतीय भेटवस्तूमुळे दोन्ही देशांतील मैत्रीचा गोडवा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रसंगाचे कौतुक करत मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.