पुणे,
Akshay Mhaske पुणे शहरातील काही महिन्यांपासून शांत असलेला टोळीवाद पुन्हा एकदा उफाळून आला असून बालाजीनगर बस स्टँड परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या थरारक गोळीबारात अक्षय म्हस्के या तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले असून, शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
अक्षय म्हस्के हा कामानिमित्त घराबाहेर पडला असताना सुमारे १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्याला गाठले. हल्लेखोरांनी त्याच्यावर थेट गोळीबार करत हल्ला चढवला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या Akshay Mhaske वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मृत अक्षय म्हस्के याचा भाऊ वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला आंदेकर आणि प्रतिस्पर्धी गटांमधील गँगवॉरचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिकांमध्येही हा हल्ला ‘रिप्लाय अटॅक’ असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.वनराज आंदेकर यांच्या खूनानंतर संबंधित आरोपींच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. काही प्रमुख गुन्हेगार सध्या तुरुंगात असले तरी बाहेर असलेल्या त्यांच्या साथीदारांकडून सूडभावनेतून कारवाया सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या घटना शहरात घडल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढत्या टोळीवादामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.