मुंबई
Salman Khan बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. विशेषत: पापाराझींसोबत घडलेल्या एका घटनेनंतर सलमानने इन्स्टाग्रामवर केलेल्या सलग पोस्ट्समुळे चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. रुग्णालयाबाहेर फ्लॅशलाइट्स आणि कॅमेऱ्यांच्या गर्दीमुळे संतापलेल्या सलमानने आता पुन्हा एकदा पापाराझींना कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानला मुंबईतीलपी. डी. हिंदुजा रुग्णालय बाहेर पाहण्यात आले होते. तो आपल्या एका जवळच्या मित्राला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. रुग्णालयातून बाहेर पडून गाडीकडे जात असताना पापाराझींनी त्याला घेरले आणि सतत फ्लॅशलाइट्सचा मारा सुरू केला. या प्रकारामुळे सलमान स्पष्टपणे नाराज झाल्याचे दिसून आले. त्याने त्याचवेळी पापाराझींना खडसावत नाराजी व्यक्त केली होती.
पोस्ट चर्चेत
या घटनेनंतर सलमान खानने इन्स्टाग्रामवर स्वतःचे चार वेगवेगळे सेल्फी पोस्ट केले. मात्र या पोस्टपेक्षा त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “जर मला हॉस्पिटलमध्ये कोणताही पत्रकार माझ्या वेदनांचा आनंद घेताना दिसला, ज्यांच्यासाठी मी नेहमी उभा राहिलो, ज्यांच्याशी मी बोललो, ज्यांची मी काळजी घेतली आणि त्यांना उदरनिर्वाह करता येईल याची खात्री केली…”
यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये Salman Khan त्याने नाराजी व्यक्त करत म्हटले, “पण जर तुम्हाला माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा. चेष्टा करू नका. भाई भाई मातृभूमी.. भाई पिक्चर.. भाई हे… भाई ते.. चित्रपट महत्त्वाचा आहे की आयुष्य?”सलमानने पुढील पोस्टमध्ये आणखी कठोर शब्दांचा वापर केला. “असे मी शंभर जाळून टाकेन. भाईच्या दु:खावर पुढच्या वेळी माझ्यासोबत प्रयत्न करून पहा. फक्त प्रयत्न करून पहा. जेव्हा कधी तुमची व्यक्ती रुग्णालयात असेल, तेव्हा मी असं वागेन का? साठ वर्षांचा झालो आहे, परंतु लढायला विसरलो नाही, हे लक्षात ठेवा. तुरुंगात टाकणार का.. हा हा हा,” असे त्याने म्हटले.
सलमान खानच्या या पोस्ट्सनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी त्याच्या भावनांना पाठिंबा दिला असून खासगी आयुष्याचा आदर करण्याची गरज व्यक्त केली आहे. तर काहींनी सेलिब्रिटी आणि माध्यमांमधील नातेसंबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, सलमानच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा पापाराझी संस्कृती आणि सेलिब्रिटींच्या गोपनीयतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.