तंटामुक्त गाव मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज

    दिनांक :21-May-2026
Total Views |
समित्या कागदावरच कार्यरत
 
मंगरूळनाथ, 
Dispute-Free Village Campaign शहरासह ग्रामीण भागातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐय टिकवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या आज अनेक ठिकाणी केवळ नावापुरत्याच उरल्याचे चित्र दिसून येत आहे. गावांमधील किरकोळ वाद, कौटुंबिक तंटे, शेतजमिनीचे प्रश्न किंवा सामाजिक मतभेद मिटवण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, अनेक गावांमध्ये समित्यांच्या बैठका नियमित होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
tanta
 
Dispute-Free Village Campaign  तंटामुक्त गाव अभियानाचा मुख्य उद्देश गावपातळीवरच वाद मिटवून न्यायालयीन प्रक्रिया टाळणे हा होता. सुरुवातीच्या काळात या समित्यांनी अनेक वाद सामंजस्याने मिटवले होते. परंतु कालांतराने समित्यांची कार्यक्षमता कमी होत गेली. काही ठिकाणी सदस्य निष्क्रिय झाले असून, अनेक गावांमध्ये समित्या केवळ कागदोपत्रीच कार्यरत आहेत. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, स्थानिक पातळीवर वाद मिटवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने लहानसहान कारणावरून वाद वाढत आहेत. काही प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे समित्यावर विश्वास कमी झाल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळे प्रशासनाने तंटामुक्त समित्यांचे पुनर्गठन करून सक्रिय सदस्यांची नियुक्ती करावी, नियमित बैठका घ्याव्यात आणि गावातील प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे. तंटामुक्त गाव समित्या प्रभावीपणे कार्यरत राहिल्यास गावातील सामाजिक वातावरण अधिक सौहार्दपूर्ण राहण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनाने या समित्यांना पुन्हा गतिमान करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.