तभा वृत्तसेवा
आर्णी,
house encroaching आर्णी नगर परिषदेच्या प्रभाग 4 मधील राधाकृष्णन शाळेला लागून असलेल्या 20 फुटांच्या रस्त्यावर मागील 35 ते 40 वर्षांपासून 10 नागरिकांनी घरे बांधून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमकांना नपद्वारे 2014 मध्ये नोटिसा बजावल्या होत्या. तेव्हापासून अतिक्रमकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी आर्णी न्यायालयाने अतिक्रमकांची याचिका फेटाळून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. नगर परिषदने बुधवार, 27 मे रोजी हे अतिक्रमण बुलडोझर चालवून काढले.
प्रभाग 4 मध्ये फाजलानी लेआऊटमधील राधाकृष्णन मराठी शाळेला लागून असलेल्या रस्त्यावर 35 ते 40 वर्षांपासून घरे बांधून अतिक्रमण केले होते. या विरोधात वहाब मोहंमद भातनासे व कल्पना गजानन पवार यांनी नपकडे जून 2014 मध्ये तक्रार दिली होती. यावर आर्णी नपने 17 डिसेंबर 2014 ला अतिक्रमक शेख जमीर शेख हमीद, दिलिप धुर्वे, सुरेश बचुलंगे, बाळू दवने, नाना दवने, शेख सिकंदर, भीमराव उईके, शेख शब्बीर शेख बादशाह, गणेश राजूरकर व शेख सलीम यांना नोटिस पाठवून अतिक्रमणे काढण्यास सांगितले होते. परंतु अतिक्रमकांनी अतिक्रमण काढले नाही. उलट आर्णी न्यायालयात याविरुद्ध याचिका केली. न्यायालयाने नुकताच अतिक्रमकांच्या विरोधात निकाल देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.house encroaching या आदेशांवरही अतिक्रमकांनी न्यायालयाला स्थगनादेश मागितला पण तो नाकारण्यात आला होता.
यानुसार नगर परिषदने मुख्याधिकारी रवींद्र राऊत, नगर अभियंता राहुल राठोड, रचना सहायक समीर जाधव, स्थापत्य अभियंता नागेश खिल्लारे, हफीज शेख, संदीप खंदार, अर्शद शेख, अनिल मते, नायब तहसिलदार प्रमोद गुल्हाने, मंडळ अधिकारी राजेश नागलकर, ग्राम महसूल अधिकारी आशिष पांचोरे, महावितरणचे गणेश ढाकुलकर, वर्षा हाके, ठाणेदार नीलेश सुरडकर, सहनिरीक्षक मिलिंद पारडकर, उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख, गुणवंत बोईनवाड, संदीप ढगे, नितीन वास्टर, देवानंद मुनेश्वर, आकाश गावंडे, मंगेश जगताप, अश्विनी उघडे यांनी चोख बंदोबस्तात अतिक्रमण काढले. ही प्रक्रिया बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चालू होती. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. अतिक्रमकांनी बुलडोझर व अधिकारी कर्मचारी येताच अतिक्रमण काढणे व घरातील सामान हलविणे सुरू केले होते.