मुंबई
Central Railway मध्य रेल्वेच्या शेलू आणि नेरळ स्थानकांदरम्यान डेक्कन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज सकाळपासून रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या घटनेमुळे डाऊन मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली असून कर्जत लोकल आणि अन्य एक्स्प्रेस गाड्या ठिकठिकाणी खोळंबल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून पुण्याच्या दिशेने निघालेली डेक्कन एक्स्प्रेस शेलू आणि नेरळ दरम्यान तांत्रिक बिघाडाला सामोरे गेली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्स्प्रेस आणि कर्जत लोकलसह अनेक गाड्या अडकून पडल्या. यामुळे वांगणी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल बदलापूर रेल्वे स्थानकातूनच रद्द किंवा वळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातून मुंबईकडे रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत असून, कार्यालयीन वेळेवरही परिणाम झाला आहे.
सीएसएमटी, ठाणे, कल्याण Central Railway तसेच कर्जत-खोपोली मार्गावरही सकाळपासून प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दीच्या वेळेतच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.डेक्कन एक्स्प्रेसमधील बिघाड दूर करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप सेवा पूर्णपणे पूर्ववत झालेली नसल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. बिघाड दुरुस्त झाल्यानंतरच डाऊन मार्गावरील गाड्या टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केल्या जातील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, आठवड्यातून अनेकदा तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत होणाऱ्या अशा घटनांमुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.