मुंबई,
Deool Band 2 Rakes in Strong Earnings प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः ईदच्या सुट्टीदरम्यान चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली असून, आठव्या दिवशीही चित्रपटाने दमदार कमाई नोंदवली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी सुमारे ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस ‘देऊळ बंद 2’ने तब्बल ३५.५० कोटी रुपयांचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या कामगिरीमुळे हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानाकडे वाटचाल करत आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर ‘देऊळ बंद 2’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ने पहिल्या आठवड्यात ४२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, ‘देऊळ बंद 2’ची वाढती लोकप्रियता पाहता हा विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.चित्रपटातील भक्ती, विनोद आणि भावनिक कथानकामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर थिएटरकडे आकर्षित होत आहेत. मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे आणि महेश मांजरेकर यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दुसऱ्या आठवड्यात कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या विकेंडमध्ये मोठी उसळी येण्याची चिन्हे दिसत असून, कमाई पहिल्या विकेंडपेक्षाही जास्त होऊ शकते, असे ट्रेड विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे लवकरच ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट ५० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा चित्रपट मोठे यश ठरत असून, बॉक्स ऑफिसवर त्याचा डंका कायम असल्याचे चित्र दिसत आहे.