सुकळी (ज) ग्रामपंचायतने घेतला ठराव
उमरखेड,
Gajanan Suroshe Murder Case सुकळी (ज) येथे शनिवार, 23 मे रोजी रात्री घडलेल्या गोरक्षकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी आता ग्रामपंचायत स्तरावरूनही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. सुकळी गावच्या सरपंच श्रद्धा बोके यांच्या अध्यक्षतेत शुक्रवार, 29 मे रोजी झालेल्या ग्रामपंचायत सभेत या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने ग्रामपंचायत सभेत पारित करण्यात आला
या घटनेत गो-तस्करांनी गजानन सुरोशे या गोरक्षकाची दगडांनी ठेचून हत्या केली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. तसेच आणखी काही आरोपींचा शोध उमरखेड पोलिस घेत असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतच्या सभेत गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले. गो-तस्करीला कोणत्याही परिस्थितीत गावात थारा दिला जाणार नाही, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.
Gajanan Suroshe Murder Case दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून गावपातळीवरूनच न्यायासाठी आवाज उठवला जात आहे. मात्र एवढी गंभीर घटना घडूनही मात्र लोकप्रतिनिधी या विषयावर तोंड उघडण्यास तयार नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर काही दिवसांनी या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करण्यास भाग पाडू, असे स्पष्ट वक्तव्य केले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले असून गोरक्षक गजानन हत्या प्रकरणात जलद आणि कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र होऊ लागली आहे.