नीट पुनर्परीक्षेसाठी एअरफोर्स मैदानात!

    दिनांक :29-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
neet re exam नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार आता कोणतीही जोखीम न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा पारदर्शक आणि पूर्णपणे सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर करून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याचा पर्याय गांभीर्याने तपासला जात आहे. या संदर्भात दिल्लीत नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली असून अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

नीट परीक्षा  
 
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान पुनर्परीक्षेची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि गुप्तता कायम राखण्यासाठी कोणती अतिरिक्त पावले उचलता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः, प्रश्नपत्रिका देशभरातील केंद्रांपर्यंत अल्पावधीत आणि पूर्ण सुरक्षेसह पोहोचवण्यासाठी भारतीय वायुसेनेची मदत घेण्याबाबत विचारमंथन झाल्याचे सांगितले जात आहे.
सरकारकडून अद्याप या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नसले, तरी पंतप्रधान कार्यालय स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. २१ जूनच्या पुनर्परीक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक टप्प्याची स्वतंत्र तपासणी आणि नियोजन केले जात आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत केवळ प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवरच नव्हे, तर प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते त्या सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या संपूर्ण यंत्रणेवर चर्चा झाली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक अभिषेक सिंह आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. प्रश्नपत्रिकांची छपाई, त्यांचे सुरक्षित साठवण केंद्र, वितरण व्यवस्था आणि परीक्षेपूर्वीची देखरेख यासह प्रत्येक बाबीवर तपशीलवार आढावा घेण्यात आला.
यावर्षी ३ मे रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये आणि १४ परदेशी केंद्रांवर NEET-UG परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास २३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र, परीक्षेनंतर काही दिवसांतच पेपरफुटी आणि अनियमिततेच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. ७ मे रोजी NTA ला या संदर्भातील प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय यंत्रणांकडे चौकशीसाठी प्रकरण सोपवण्यात आले.
त्यानंतर वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर NTA ने १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि २१ जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयकडे असून देशभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू आहे.
सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्या नगरसह विविध शहरांत कारवाई करत १३ आरोपींना अटक केली आहे.neet re exam central तपासादरम्यान प्रश्नपत्रिका फुटीमागील मुख्य साखळीचा उलगडा झाल्याचा दावा यंत्रणांनी केला असून पुढील चौकशी आणि अटकसत्र सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पुनर्परीक्षा कोणत्याही वादाशिवाय आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणारी ठरावी यासाठी केंद्र सरकारकडून अभूतपूर्व सुरक्षा नियोजन करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.