पुणे
Food and Drugs Administration राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) २५ ते २७ मे या कालावधीत राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करत ५३ पैकी ३४ आस्थापनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत १३ लाख २७ हजार २९६ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून २७ आस्थापने सील करण्यात आली आहेत, तर ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात वेगवेगळ्या विभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. सर्वाधिक कारवाई मुंबई विभागात झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील तपासणी केलेल्या सर्व १९ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित अन्नसाठा आढळून आला. या कारवाईत १९ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे ९८,४९८ रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
कोकण विभागात १० आस्थापनांवर Food and Drugs Administration कारवाई करत ९ जणांना अटक करण्यात आली असून ६ लाख ५९ हजार ९४४ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नागपूर विभागात २ पैकी १ आस्थापनेत प्रतिबंधित अन्नसाठा आढळून आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी २ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.पुणे विभागातही तपासणीदरम्यान २ लाख ४२ हजार ३९२ रुपयांचा साठा जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक आणि अमरावती विभागात मिळून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून दोन्ही विभागांत मिळून ६९ हजार ९६५ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.या संपूर्ण राज्यव्यापी मोहिमेत तब्बल २७२ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा सहभाग होता. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.