‘साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच

    दिनांक :29-May-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेत उद्यापासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.या चर्चेसाठी राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उपस्थित होते. मराठा आरक्षणाशी संबंधित नोंदी आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही बाजूंमध्ये सविस्तर चर्चा झाली. मात्र काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
 

Manoj Jarange Patil, Maratha Reservation Protest, 
चर्चेदरम्यान राज्यात सुमारे ५८ लाख मराठा नोंदी सापडल्याची माहिती जरांगे पाटील यांनी मांडली. या नोंदींची संपूर्ण यादी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली असून, संबंधित मराठा बांधवांना त्यांच्या नोंदींची माहिती देऊन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणीही त्यांनी केली. काही नोंदी अद्याप प्रक्रियेतून वगळल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी जरांगे पाटील यांनी तीव्र Manoj Jarange Patil  भूमिका घेत “साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. त्यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा राज्यात केंद्रस्थानी आले आहे.
 
 
दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी म्हणून मान्य असल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. मात्र या आधारे पात्र ठरलेल्या नागरिकांना प्रत्यक्षात जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अनेकांना प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही वैधता (व्हॅलिडिटी) प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार त्यांनी मांडली.
 
मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन करत त्यांनी मराठा समाजाला एकदाच आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे भवितव्य या प्रक्रियेमुळे अडकून पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत अडथळे आणले जात असल्याचा दावा केला. काही अधिकाऱ्यांना थेट फोन करून प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयांमध्ये वरिष्ठ स्तरावरील हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.आता उद्यापासून सुरू होणाऱ्या उपोषणामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील पुढील चर्चा काय दिशा घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.