नवी दिल्ली,
NTA NEET नीट यूजी पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर एनटीएने परीक्षा पद्धतीत मोठ्या संरचनात्मक आणि सुरक्षा सुधारणा लागू केल्या आहेत.हे प्रकरण फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन्स आणि युनायटेड डॉक्टर्स फ्रंट यांनी दाखल केलेल्या याचिकांशी संबंधित आहे, ज्यात नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर एनटीएच्या प्रणालीत व्यापक बदलांची मागणी करण्यात आली आहे.
एनटीएने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, 17 एप्रिलला उच्चाधिकार सुकाणू समितीची (एचपीएससी) बैठक झाली. या बैठकीत नीट यूजी 2026 च्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि परीक्षेपूर्वी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर लागू करण्यासाठी अनेक सुरक्षा उपायांची शिफारस करण्यात आली. समितीने सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही प्रणालीची अनिवार्य चाचणी करण्याची आणि फुटेज किमान 90 दिवसांसाठी जतन करण्याची शिफारस केली. तसेच, परीक्षा केंद्रांवर मॉक ड्रिल आयोजित करणे, हवामानाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीसाठी एक स्वतंत्र योजना विकसित करणे, पॉवर बॅकअप प्रणालीची चाचणी करणे आणि वैद्यकीय आपत्कालीन सुविधा सुनिश्चित करण्याची शिफारस केली.
परीक्षा केंद्रांच्या पूर्व-तपासणीसाठी सूचना
एनटीएने न्यायालयाला माहिती दिली की, परीक्षेच्या आधीच्या आठवड्यात सर्व परीक्षा केंद्रांची सविस्तर तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान लगेच लक्षात न आलेल्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा अनियमितता ओळखण्यासाठी परीक्षेनंतर सीसीटीव्ही फुटेजचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्याची शिफारस देखील केली. समिती भविष्यात सीबीटी (संगणक-आधारित चाचणी) पद्धतीवर निर्णय घेऊ शकते.
लेखी पररीक्षबाबत मंत्रालयासोबत करणार चर्चा
प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, NTA NEET नीट यूजी 2026 परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उच्चाधिकार सुकाणू समितीची पुन्हा बैठक होईल. या कालावधीत, भविष्यात नीट परीक्षा संगणक आधारित चाचणी पद्धतीने घ्यावी की सध्याची लेखी परीक्षा पद्धत सुरू ठेवावी, हे ठरवण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत चर्चा केली जाईल.