नवी मुंबई
onion price वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरूनही खरेदीदारांची वानवा कायम असल्याने बाजारात मंदीचे गडद सावट निर्माण झाले आहे. कांद्याचे दर १० ते १२ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले असतानाही अपेक्षित उठाव न मिळाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील हॉटेल व्यवसाय मंदावल्याचा थेट परिणाम कांद्याच्या मागणीवर दिसून येत आहे. याशिवाय काही भागांत गॅस सिलिंडर पुरवठ्यातील अडचणी आणि त्यातून निर्माण झालेल्या मर्यादांमुळे लहान-मोठ्या उपाहारगृहांचे कामकाजही प्रभावित झाले आहे. परिणामी कांद्याचा मोठा ग्राहकवर्ग कमी झाल्याने बाजारातील खरेदीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.एपीएमसी बाजारात दररोज साधारण १०० ते १५० लहान-मोठ्या वाहनांमधून कांद्याची आवक होत असली तरी त्या तुलनेत खरेदी अत्यंत कमी असल्याने माल साठून राहत आहे. पूर्वी सहज विकला जाणारा कांदा आता खरेदीदारांच्या प्रतीक्षेत पडून राहत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. चार दशकांपासून या व्यवसायात कार्यरत असलेल्या काही व्यापाऱ्यांच्या मते, अशी स्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती.
मालाचा पुरवठा सातत्याने सुरू onion price असला तरी तो उचलण्यासाठी ग्राहक नसल्याने बाजारातील दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. परिणामी उलाढालीवरही परिणाम जाणवत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे. दर घसरले असतानाही मागणी वाढत नसल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.निर्यात थांबल्यामुळे अतिरिक्त कांदा देशांतर्गत बाजारात साचत आहे. पुरवठा वाढलेला आणि मागणी घटलेली अशी दुहेरी स्थिती निर्माण झाल्याने दरांवर थेट दबाव येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा उत्पादनासाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत असून सध्याच्या दरांमध्ये तो खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वी हा उत्पादन खर्च सुमारे ३० हजार रुपये इतका होता; मात्र आता तो तीनपट वाढला असून उत्पन्न मात्र अपेक्षित प्रमाणात वाढलेले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक तोट्यात सापडले आहेत.एकूणच, दर घसरूनही मागणी वाढत नसल्याने मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात मंदीचे सावट अधिक गडद झाले असून संपूर्ण पुरवठा साखळीवर त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत.