मुंबई
Sunglasses Ban आयपीएल २०२६ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आणखी एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. स्पर्धेतील पारदर्शकता, सुरक्षा आणि सामन्यांची निष्पक्षता कायम राखण्यासाठी खेळाडू आणि मॅच अधिकाऱ्यांना स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही बोर्डाने दिला आहे.
बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटने सर्व फ्रँचायझींना यासंदर्भात अधिकृत सूचना पाठवली आहे. त्यानुसार, पीएमओए अर्थात ‘प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया’मध्ये कोणत्याही प्रकारचे स्मार्ट सनग्लासेस वापरण्यास परवानगी राहणार नाही. बोर्डाच्या मते, आधुनिक स्मार्ट सनग्लासेसमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल डेटा किंवा वाय-फायद्वारे संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे यांसारख्या सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे सामन्याच्या सुरक्षेला आणि गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो.
बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, स्मार्ट सनग्लासेस हे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरणांबरोबरच संवाद साधणारी साधने म्हणून गणली जातात. त्यामुळे आयपीएलमधील सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना मैदानात किंवा ड्रेसिंग रूम परिसरात प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल फोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट सनग्लासेस सुरक्षा संपर्क अधिकाऱ्याकडे जमा करावे लागणार आहेत.
बीसीसीआयने या Sunglasses Ban निर्णयाबाबत कठोर भूमिका घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीएल आचारसंहितेनुसार कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाईसह अन्य शिस्तभंगाची शिक्षा होऊ शकते, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.दरम्यान, स्पर्धेच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांच्याशी संबंधित एक वाद समोर आला होता. सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या प्रकरणात बीसीसीआयने त्यांना ताकीद देतानाच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर आता बोर्डाने अधिक कडक पावले उचलत तांत्रिक उपकरणांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत.
आयपीएलच्या वाढत्या Sunglasses Ban लोकप्रियतेसोबतच सामन्यांच्या सुरक्षेला आणि भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून घेतला गेलेला हा निर्णय आगामी काळात इतर क्रिकेट स्पर्धांसाठीही आदर्श ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.