मनोज जरांगे माझे मित्र, पण तेही कलाकार… आठवलेंचा मिश्कील टोला

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई
Ramdas Athawale मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडींवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांना “मित्र” म्हणत “तेही कलाकार आहेत” असा मिश्कील चिमटा काढला आहे.
 

Ramdas Athawale  
मिठी नदीच्या पाहणीदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना संयत भूमिका घेतली. “मनोज जरांगे माझे चांगले मित्र आहेत, तेही कलाकार आहेत. त्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, यावर मी फार काही बोलणार नाही,” असे ते म्हणाले.दरम्यान, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला असून, सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी मात्र राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूने असल्याचा दावा केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत Ramdas Athawale बोलताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला अधिक प्रभावीपणे मिळावा, अशी आमची मागणी आहे. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा अपेक्षित फायदा समाजापर्यंत पोहोचत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.याचबरोबर रिपब्लिकन पक्षाला शासकीय महामंडळांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “आम्हाला दोन ते तीन महामंडळांची अध्यक्षपदे मिळावीत, याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तसेच विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याबाबतही अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही,” असे आठवले यांनी सांगितले.मिठी नदी स्वच्छतेबाबतही त्यांनी भाष्य केले. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर येतो आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे गाळ काढण्याचे काम 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन महानगरपालिकेने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.