मुंबई,
Salman Steps Forward for Don 3 बॉलिवूडमध्ये सध्या ‘डॉन 3’ या चित्रपटाभोवती सुरू असलेला वाद अधिकच तापला असून आता या प्रकरणात सुपरस्टार सलमान खानची एंट्री झाल्याची चर्चा जोर धरत आहे. रणवीर सिंहने अचानक चित्रपटातून माघार घेतल्याने दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रणवीर यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या संपूर्ण वादात आता सलमान खानने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमानने रणवीर सिंह आणि फरहान अख्तर या दोघांनाही फोन करून प्रकरण शांततेत सोडवण्याचा सल्ला दिला आहे. कोणताही गाजावाजा न करता आपापसातील मतभेद दूर करून पुढील प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करावे, असे त्याचे म्हणणे असल्याचे सांगितले जात आहे.
सलमान खानचे रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्या कुटुंबाशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्याने दोघांशी स्वतंत्रपणे संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. इंडस्ट्रीतील सर्जनशील मतभेद ही सामान्य गोष्ट आहे आणि ते वाढवण्याऐवजी सोडवणे योग्य ठरेल, असा सल्ला सलमानने दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली तरी बॉलिवूडमध्ये ‘डॉन 3’ वाद आणि सलमान खानच्या मध्यस्थीच्या चर्चांना चांगलाच वेग आला आहे. आता सलमानचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो का, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.