वेध...
रेवती जोशी-अंधारे
Sarajevo Safari आपण भारतीय (अपवाद वगळता) नीतिमूल्ये मानणारे, देवाधर्माचे करणारे थोडक्यात पापभिरू असतो. सुखाच्या आणि आनंदाच्या आपल्या कल्पना खूप काही जगावेगळ्या नसतात. कुटुंबासोबत फिरायला जायचा विचार आला की, पहिला विचार असतो सफारीचा! सफारी म्हणताच डोळ्यांपुढे येते ती गर्द वनराई, रुबाबदार पण हिंस्त्र श्वापदांची डौलदार चाल, एखादा नवा पदार्थ, मोकळी हवा, भरपूर फोटोज आणि क्षणभर विश्रांती! पण, जगात सर्वत्र असे नाही. ज्या युरोपला शिस्त, स्वच्छता आणि आधुनिकतेसाठी आदर्श मानले जाते तिथे ‘साराजेवो सफारी’ हा बीभत्स प्रकार अस्तित्वात आला.

गेल्याच आठवड्यात बोस्निया युद्धातील गुन्ह्यांची सुनावणी नव्याने सुरू झाली आणि साराजेवो सफारी पुन्हा चर्चेत आली. साराजेवो हे युरोपातील एक सुंदर शहर! पहिल्या महायुद्धाची ठिणगी जिथे पडली ते साराजेवो! बोस्निया आणि हर्जगाव्हिना या दोन देशांची सामायिक राजधानी असलेल्या साराजेवोला 1992 ते 1995 दरम्यानच्या घटनाक्रमाने वॉर टुरिझमचे केंद्र म्हणून ओळख मिळाली. या काळात साराजेवोत मृत्यूने थैमान घातले. एकीकडे भीषण युद्धाला तोंड फुटले असताना, साराजेवोमध्ये मात्र महिला आणि लहान मुलांच्या हत्यांना ऊत आला होता.
शहराच्या बाहेर असलेल्या डोंगरांवर बसून, स्नायपर दुर्बिणीने रस्त्यावर दिसलेल्या माणसांना टिपून त्यांची ‘शिकार’ करायची, असा हा श्रीमंती शौक! या खुल्या हत्यांसाठी हजारो डॉलर्स मोजले जात होते. स्नायपर सफारी सुरू असताना, घराबाहेर निघणे एवढाच त्या बिचाèयांचा गुन्हा होता. सुरुवातीला कोण, कुठून आणि कशाला गोळ्या घालतंय? याचा काही अंदाजच येत नव्हता. विदेशातून आलेले गर्भश्रीमंत पण अमानुष लोक गंमत म्हणून या लोकांना मारत होते. भारतात राजेरजवाडे शिकारीला जात, तसे हे माणसांची शिकार करत होते. पैसे देऊन, स्नायपरने निशाणा लावायचा. शिकार मिळाली तर छानच पण, नाही मिळाली तर आणखी पैसे देऊन खेळ सुरू ठेवायचा.
बोस्नियाच्या सैन्याने 4 वर्षे साराजेवोला घेराव घातला होता आणि याच काळात साराजेवो सफारी सुरू झाली आणि फोफावली. त्यावेळी, युगास्लोव्हाकीयापासून वेगळे होऊन स्वतंत्र राष्ट्र बनण्यासाठी बोस्नियाचे लोक प्रयत्नशील होते. पण, बोस्नियाई सर्ब सैन्य मात्र याविरोधात होते. नागरिकांवर सूड उगविण्याची ही अमानुष पद्धत सर्ब सैन्याधिकाèयांनी अमलात आणली. घराबाहेर निघणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण! शाळा-ऑफिसेस तर कधीच बंद पडलीत. दैनंदिन वस्तूंचा तुटवडा झाला. वेळेवर औषधं न मिळाल्यानेही मृत्यू झाले. शहरातील ‘स्नायपर ऐली’ नावाच्या रस्त्यावर सर्वाधिक मृतदेह सापडल्याची नोंद झाली.
या नृशंस हत्याकांडावर खरी चर्चा सुरू झाली ती 2022 मध्ये आलेल्या ‘साराजेवो सफारी’ या माहितीपटानंतर! स्लोव्हेनियाच्या मिरान झुपनिक याने प्रत्यक्षदर्शींचे अनुभव, मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती, शहरातील इमारतींमध्ये रुतलेल्या गोळ्या असे सगळे जगासमोर आणले आणि या घटना खोट्या असल्याचे दावे फोल ठरले.Sarajevo Safari पत्रकार दोमगाज मार्गेटीक यांच्या ‘पे अॅण्ड शूट’ या पुस्तकाने ऑस्ट्रियामध्ये ही चर्चा आणि खुल्या तपासाला सुरुवात झाली. गेल्या वर्षी इटलीच्या मिलानमध्ये या संदर्भातील गुन्हे नोंदविण्यात आले. चार वर्षे चाललेल्या शहराच्या घेरावात 11 हजारांवर लोक मारले गेले. यात वृद्ध, महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती.
गंमत म्हणून माणसाची शिकार करणाèयांमध्ये अमेरिकन, ऑस्ट्रियन आणि इटलीची बडी धेंडं हौशीने सहभागी झालीत. शहराची घेराबंदी आणि शहराबाहेरच्या डोंगरांवर बसलेले हौशी शिकारी अशा दुहेरी कात्रीत निष्पाप नागरिक फसले होते. या सफारीच्या माध्यमातून सर्ब सैन्याधिकाèयांनी जबर कमाई केली. एका स्नायपर टुरिस्टकडून महिला-मुलांची शिकार करण्यासाठी 90 हजार डॉलर्स घेतले जात होते. हे ‘शिकारी’ आज 80-90 वर्षांचे आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे, यापेक्षा दुर्दैव आणखी काय असेल?
दरम्यान, यापैकी एकही घटना कोणत्याही न्यायालयात सिद्ध होऊ शकलेली नाही. पण, लोकांचे अनुभव माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. आपल्या मुंबईत 60 च्या दशकात रामण राघव या देशातील पहिल्या सीरियल किलरने दहशत निर्माण केली होती. थंड डोक्याने 41 हत्या करणारा राघव मानसिक रुग्ण होता. तो एक होता पण, साराजेवोमध्ये येऊन माणसांना टिपणारे त्याच्यासारखे कित्येक इतिहासाच्या उदरात गडप झाले. सध्याचे फ्रीफायर आणि पब जीसारखे खेळ ‘क्रेझीनेस’च्या नावाखाली मनोरुग्णांची पिढी घडवत आहेत का?
9850339240