धक्कादायक २२ जणांना अन्नातून विषबाधा

    दिनांक :29-May-2026
Total Views |
ठाणे
Shahapur food poisoning शहापूर तालुक्यातील शिळ गावात अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कार्यक्रमानंतर ग्रामस्थांना अचानक उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाधितांना तातडीने किन्हवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

Shahapur food poisoning 
काय आहे प्रकरण
शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील शिळ गावात रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सामूहिक जेवणातून एकाच कुटुंबातील २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. प्रकृती बिघडलेल्या सर्वांना किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. शिळ गावातील अशोक भोईर यांच्या मातोश्री बारकाबाई बाळू भोईर यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि पाहुण्यांची उपस्थिती होती. दुपारी तयार करण्यात आलेले जेवण रात्री उरलेले असल्याने तेच अन्न कुटुंबीयांनी पुन्हा सेवन केल्याचे सांगितले जात आहे. Shahapur food poisoning जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि तापाचा त्रास सुरू झाला. रात्री नऊच्या सुमारास एकामागोमाग एक जणांची प्रकृती खालावू लागल्याने नातेवाईकांनी तातडीने सर्वांना किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी सर्वांना पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात उपचार सुरू होते. सुदैवाने सर्व रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
 
 
विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे
मंदा भालचंद्र भोईर (३६), हरी नामा भगत (५०), अलका हरी भगत (४५), गीता अशोक भोईर (४०), प्रिया अशोक भोईर (१७), अनुष्का अशोक भोईर (११), सुभाष बाळू भोईर (५३), मयूर सुभाष भोईर (२२), नितीन सुभाष भोईर (२४), हरी दाजी भोईर (६४), कविता किसन शिंगोळे (४२), राजश्री अनंता भोईर (४६), गणेश अनंता भोईर (१७), बाळू दाजी भोईर (८०), सुमन सुभाष भोईर (४२), मंदा भानुदास भोईर (५१), भानुदास भगवान भोईर (५१), कल्पेश भानुदास भोईर (२४), भालचंद्र भगवान भोईर (५१), अशोक बाळू भोईर (५२), अनंता हरी भोईर (६०) आणि अक्षता अशोक भोईर (१७).