मुंबई
Vaibhav Suryavanshi इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा अंतिम टप्पा अत्यंत रंगतदार बनला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर आता दुसरा अंतिमवादी संघ कोणता ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात २९ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात अंतिम फेरीचं तिकीट कोण मिळवणार याचा फैसला होणार आहे. या निर्णायक लढतीत राजस्थानचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर प्रभावी विजय मिळवत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, साखळी फेरीत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवल्यामुळे गुजरातला क्वालिफायर १ मधील पराभवानंतर आणखी एक संधी मिळाली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीकडून पराभव पत्करल्यानंतर आता गुजरातसमोर ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजीची धुरा पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर असणार आहे. एलिमिनेटरमध्ये सनरायझर्सविरुद्ध त्याने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्या या विस्फोटक फलंदाजीमुळे गुजरातच्या गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. वैभवला लवकर बाद करण्यात अपयश आल्यास सामना राजस्थानच्या बाजूने झुकू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.वैभवचा चालू हंगामातील फॉर्मही जबरदस्त राहिला आहे. आयपीएल २०२६ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून १५ सामन्यांत त्याने ६८० Vaibhav Suryavanshi धावा केल्या आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राजस्थानच्या फलंदाजीला स्थैर्य लाभलं असून संघ व्यवस्थापनालाही त्याच्याकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.विशेष म्हणजे, गुजरात आणि राजस्थान यांच्यातील या मोसमातील ही तिसरी लढत असणार आहे. साखळी फेरीत झालेल्या दोन्ही सामन्यांत वैभवने गुजरातच्या गोलंदाजांवर आक्रमक खेळी केली होती. पहिल्या सामन्यात त्याने १८ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या १६ चेंडूंमध्ये ३६ धावा करत ३ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली होती. त्यामुळे क्वालिफायर २ मध्ये गुजरातचा मुख्य भर वैभवला मोठी खेळी करण्यापासून रोखण्यावर असणार आहे.दुसरीकडे, गुजरातकडे अनुभवी खेळाडूंसह संतुलित संघरचना असल्याने तेही पुनरागमनासाठी सज्ज आहेत. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांकडून आक्रमक आणि दडपणाखालील क्रिकेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये होणारा हा सामना आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात रोमांचक लढतींपैकी एक ठरण्याची चिन्हे आहेत.