येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हिंसक हल्ला

तंबाखूवरून वाद पेटला, एक कैदी गंभीर जखमी

    दिनांक :29-May-2026
Total Views |
पुणे
Yerwada Jail violence कडक सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असलेल्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हिंसक वादामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तंबाखूच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की दोन कैद्यांनी मिळून एका कैद्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 

Yerwada Jail violence 
ही घटना २७ मे रोजी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास सर्कल क्रमांक दोनमधील सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याच्या हौद परिसरात घडली. या ठिकाणी कैदी शुभम पोखरेकर उभा असताना दुसरा कैदी अजय शंकर राठोड तेथे आला आणि तंबाखूच्या कारणावरून त्याच्याशी वाद घालू लागला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणांतच हिंसक रूप धारण करू लागला.
 
 
संतापाच्या भरात अजय राठोड Yerwada Jail violence याने कारागृहात जेवण वाटपासाठी वापरण्यात येणारी जड लाकडी पट्टी हातात घेत शुभम पोखरेकर यांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या हल्ल्यात आणखी तीव्रता आणत संतोष सुरेश भालेराव या दुसऱ्या कैद्यानेही बाजूला असलेली जड प्लॅस्टिकची बादली उचलून शुभमच्या डोक्यावर मारली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कारागृह परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कारागृह रक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गंभीर जखमी झालेल्या शुभम पोखरेकर याला तातडीने कारागृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवनाथ कडू कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कैदी अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कारागृहासारख्या उच्च सुरक्षा व्यवस्थेत घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, येरवडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.