शिंदेंचा कडक इशारा; नराधमाला फाशीची तयारी

    दिनांक :03-May-2026
Total Views |
पुणे,
eknath-shinde : पुणे जिल्ह्यातील भोर-नसरापूर परिसरात घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध मजबूत पुरावे गोळा करून त्याच्यावर जलदगतीने खटला चालवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी सर्व शक्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना दिले.
 
 
SHINDE
 
 
 
या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोर आणि नसरापूर भागात ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केला. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून, त्यांनीही आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
 
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आरोपीने केलेले कृत्य अत्यंत गंभीर असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील राहील असेही सांगितले आहे. यासाठी संबंधित कायद्यांखाली गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
सरकारने या प्रकरणात पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.