नाशिक,
TCS Nashik टीसीएस नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि धार्मिक जबरदस्ती प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खान यांना नाशिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत, तपासासाठी त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कार्यरत काही कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यामध्ये लैंगिक छळ, धार्मिक भावना दुखावणे तसेच जबरदस्तीने धार्मिक बदल घडवण्याचा प्रयत्न यासारख्या आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असून आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
निदा खान यांच्या वतीने TCS Nashik दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने गर्भधारणा आणि प्रकरणातील मर्यादित सहभागाचा मुद्दा मांडला होता. मात्र सरकारी पक्षाने आरोपांची गंभीरता अधोरेखित करत, सखोल तपासासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी अत्यावश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने या युक्तिवादाशी सहमती दर्शवत जामीन नाकारला.या निर्णयामुळे तपास यंत्रणांना पुढील चौकशीसाठी अधिक मोकळीक मिळणार असून, प्रकरणातील इतर पैलूंवरही तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात तसेच नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कंपनीच्या अंतर्गत कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.