गहू व तांदूळ अक्षरश: सडलेले
अंजनगाव सुर्जी,
anjangaon : "swast dhany dukan' अंजनगाव सुर्जी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे गहू व तांदूळ वाटप होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून, या प्रकारामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धान्यामध्ये खराब वास, किड लागलेले, सडलेले, ओले झालेले वाळविलेले गहू तसेच तुटलेला व निकृष्ट तांदूळ मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गरीबांना मोफत किंवा स्वस्त धान्याच्या नावाखाली विष दिले जात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक लाभार्थ्यांनी धान्याची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचा आरोप करीत संबंधित पुरवठा विभाग आणि स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुरवठा विभागातील अधिकार्यांनी जर गहू किंवा तांदूळ खराब असेल तर ते परत आणा, बदलून दिले जाईल, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, प्रश्न असा उपस्थित होत आहे की, जर धान्य निकृष्ट आहे हे मान्यच असेल तर ते नागरिकांना वाटपच का करण्यात आले. शिवाय निकृष्ट गहू गोडाऊनमध्ये येतात तरी कसे आणि ते दुकानांपर्यंत पोहोचतात तरी कसे, दुकानदार नागरिकांना असे धान्य देतात तरी कसे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक वेळा ग्राहकांनी खराब धान्य घेण्यास नकार दिल्यानंतर दुकानदारांकडून आमच्याकडे जे आले आहे तेच द्यावे लागेल, आता हे दुसरीकडे कुठे ठेवायचे, असे सांगून जबरदस्तीने निकृष्ट दर्जाचे गहू व तांदूळ दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
anjangaon : "swast dhany dukan' यामुळे गोरगरिबांच्या जीवाशी खेळ करणार्या या निकृष्ट गहू व तांदळाची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातही या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. नागरिकांनी या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गरीबांच्या ताटात निकृष्ट धान्य देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ करणार्यांना माफी नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.