-आशुतोष अडोणी यांचे प्रतिपादन
-स्वा. सावरकर जयंती महोत्सवाचा समारोप
-व्याख्यानाला आजही हाऊसफुल गर्दी
नागपूर,
Ashutosh Adoni स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्रजीवनाला विचारांची नवी दिशा देणारे तत्त्वचिंतकही होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोणी यांनी केले. क्रांतिकारक चळवळीला केवळ संघर्षाची दिशा देणे एवढेच नव्हे, तर त्या क्रांतीला वैचारिक अधिष्ठान व तत्त्वज्ञान प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सावरकरांनी केले, असेही ते म्हणाले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त आयोजित अंदमान एक तीर्थक्षेत्र... या त्रिदिवसीय महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ‘समाजक्रांतिकारक सावरकर’ या विषयावरील व्याख्यानात आशुतोष अडोणी बोलत होते. त्यांच्या रसाळ वाणीतून सावरकर ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. लक्ष्मीनगरातील व्हॉलिबॉल मैदानात श्रोेत्यांनी आजही अक्षरशः हाऊसफुल गर्दी केली.
आशुतोष अडोणी त्यांच्या उद््बोधनात म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात कर्मयोग, बुद्धियोग भक्तियोग या तिन्ही योगांचा अद्भुत संगम दिसून येतो. या तिन्ही योगांची साधना करत असताना त्यांच्या प्रत्येक कृतीमागे मातृभूमीवरील उत्कट प्रेम हेच प्रेरणास्थान होते. त्यामुळेच सावरकरांच्या संपूर्ण जीवन वसमाजकार्याचे अधिष्ठान देशप्रेम हेच राहिले. सावरकरांची सामाजिक क्रांती पहिल्यांदा त्यांच्या कवितेतून प्रकटली. आपल्या असामान्य प्रतिभेचा उपयोग त्यांनी समाजजागृती व सामाजिक परिवर्तनासाठी केला. प्रतिभेचा समाजहितासाठी केलेला हा उपयोग म्हणजेच त्यांच्या जीवनातील भक्तियोगाचे दर्शन होय.
अंदमानातील सेल्युलर जेलमधील त्यांच्या संघर्षमय जीवनाकडे पाहिले तर ते व्यक्तिमत्त्व विकासाची एक जिवंत पाठशाळाच वाटते. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयाशी निष्ठा, विचारांशी बांधिलकी व राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती यामुळे सावरकर आजही प्रेरणादायी ठरतात, असे ते म्हणाले. आजच्या काळात महापुरुषांविषयी बेजबाबदारपणे वक्तव्ये केली जात असल्याची खंत व्यक्त करत समाजाने याबाबत अधिक सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला पत्रकारप्रमोद काळबांडे व श्रीपाद अपराजित, सुदर्शन समाजाचे पुजारी श्याम बोस तसेच अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची प्रतिकृती साकारणारे कलाकार व सिव्हिल इंजिनीअर प्रफुल्ल माटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Ashutosh Adoni प्रास्ताविकात मनोज देशपांडे यांनी श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे, स्वा. सावरकरांना प्रत्यक्ष भेटलेल्या उषाताई चाटी, मंदा जोशी, रवींद्र भुसारी, डॉ. कुमार शास्त्री, जयंत आदमने, संजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंच संयोजन आनंद टोळ, प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले. महोत्सवात उभारण्यात आलेली अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती व लाईट साऊंड शोला रसिकांनी दाद दिली.