युवक काँग्रेसचा तीव्र विरोध
अमरावती,
Sant Gadge Baba Amravati University संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट असलेल्या ग्रेट शेरलॉक कंपनीतर्फे शनिवारी स्थानिक रामगिरी हॉटेल येथे विविध पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून नोकरी देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी दहा हजार रुपये मागितले जात असल्याची माहिती शहर युवक काँग्रेसला मिळाली. त्याची दखल घेत पदाधिकार्यांनी मुलाखतस्थळी धाव घेत संबंधितांकडे विचारणा केली. यावेळी उपस्थित उमेदवारांनी पण पैशांची मागणी झाल्याचा आरोप केल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
Sant Gadge Baba Amravati University या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी सदर भरती प्रक्रिया ही कंत्राटदार कंपनीमार्फत राबविण्यात येत असल्याचे सांगत या प्रकरणाबाबत अनभिज्ञता दर्शविली. मात्र भरती प्रक्रियेतील संशयास्पद बाबी लक्षात घेता युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवून पारदर्शक चौकशीची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी आला. यावेळी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, एनएसयूआय शहराध्यक्ष संकेत साहू, आकाश गेडाम, शुभम बांबल यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. प्रशांत विघे व अमोल देशमुख उपस्थित होते. युवक काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, पारदर्शक आणि गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकार्यांनी रिक्रुटमेंट व कन्सल्टन्सी शुल्क घेत असल्याचे सांगून गैरप्रकराचा आरोप फेटाळला.