राज्यात उष्णतेची लाट कायम हवामान विभागाचा इशारा

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra heatwave alert  राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून, एकीकडे प्रचंड उष्णतेची लाट तर दुसरीकडे काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मे महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेने वाढू शकते, मात्र सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
 

Maharashtra heatwave alert   
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा 45 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याची नोंद झाली असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक तीव्र असल्याने नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचे संकेत मिळत असून ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा दिलासा सर्वत्र नसून राज्यातील बहुतांश भाग अजूनही उष्णतेच्या झळांनी होरपळत आहे.विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात काही दिवस ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांमुळे उष्णतेत काहीशी घट जाणवली होती. मात्र पुन्हा एकदा तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यातही तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचले असून उष्णतेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणीटंचाई आणि तीव्र उन्हामुळे पशुपालकांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव Maharashtra heatwave alert  जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी 43 अंशांपर्यंत गेलेले तापमान आता 40 अंशांपर्यंत खाली आले असून उष्णतेची तीव्रता किंचित कमी झाल्याने नागरिकांना काहीसा आराम मिळाला आहे. तरीही आगामी काही दिवसांत पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.सध्या राज्यात उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता अशा दुहेरी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हवामानातील या अनिश्चित बदलांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून उष्णघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही निरीक्षण नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.