मुंबई
Mumbai hit and run मुंबईतील पवई परिसरात जेव्हीएलआर मार्गाजवळील आयआयटी मार्केट परिसरात भीषण रस्ता अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याने तीन जण जखमी झाले असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्रीच्या सुमारास पवईतील आयआयटी मार्केट परिसरात एक क्रेटा कार अतिशय वेगाने जात होती. जेव्हीएलआर मार्गावरील महात्मा फुले नगरजवळ चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने कार थेट रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की काही पादचारी दूरवर फेकले गेले आणि परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली तसेच पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका महिलेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र पवई पोलिसांनी तत्काळ Mumbai hit and run कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी १९ वर्षांचा असल्याचे समोर आले असून त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपघातानंतर पळून जाणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले असून चालक दारूच्या नशेत होता का, याबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच अपघाताच्या नेमक्या कारणांचा आणि वाहनाच्या वेगाचा अंदाज घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे जेव्हीएलआरसारख्या वर्दळीच्या रस्त्यांवर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी अशा अपघातांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर वाहतूक नियंत्रण उपाययोजनांची मागणी केली आहे.