अग्रलेख
bjp victory युद्धात आणि राजकारणात एकच गोष्ट सत्य असते- ‘जो जीता, वही सिकंदर’! केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांच्या व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचे जे निकाल समोर येत आहेत, ते पाहता आता देशभरातील भाजपाविरोधी पक्ष आणि मोदीविरोधकांच्या टोळ्या छाती पिटून पराजयाचे जुने-नवे प्रभावशून्य सिद्धान्त मांडण्यासाठी धडपडू लागतील. पण, आता निवडणुका पार पडलेल्या राज्यांतील किंवा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही. कारण, भाजपाला मिळालेल्या यशाचे सारे श्रेय त्या मतदारांचेच असेल आणि विरोधकांची बोथट विश्लेषणे हा त्या मतदारांवरच थेट अविश्वास ठरेल. म्हणूनच, भाजपाच्या नव्या विजयाची नोंद ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा केवळ दोन विशेषणांनीच करता येईल. पश्चिम बंगालसारख्या राज्यात, जेथे भाजपाला चंचुप्रवेशासाठीदेखील खडतर परिश्रम घ्यावे लागत होते, तेथे काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस यांना जबर धक्का देत भाजपाने नेत्रदीपक विजय संपादन केला आहे.

या एकाच कारणासाठी या निवडणुकांमधील भाजपाचा विजय हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक ठरतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, म्हणजे 1947 ते 1977 अशा सलग 30 वर्षांची काँग्रेसची राजवट संपुष्टात आणून डाव्या आघाडीने पश्चिम बंगालवर मिळविलेली सत्ता तृणमूल काँग्रेसने 34 वर्षांनंतर हस्तगत केली. जवळपास 15 वर्षांच्या सत्ताकाळात ममता बॅनर्जी यांनी या राज्यास अक्षरशः वेठीस धरले. ममता बॅनर्जी यांनी केलेली राज्याची दुर्दशाच अखेरीस त्यांची सत्तेवरून हकालपट्टी करण्यास कारणीभूत ठरली. या पराभवाचे खरे विश्लेषण करावयाचे झाले, तर या राज्यातील मतदारांनी ममता दीदी व त्यांच्या पक्षाला दंडित केले, असेच म्हणावे लागेल. बेकायदा घुसखोरांवर मेहेरनजर, अल्पसंख्यकांच्या लांगूलचालनासाठी बहुसंख्यकांच्या विरोधात टोकाची विद्वेषी भूमिका आणि राजकीय आक्रस्ताळेपणाचा अतिरेक करणारी व लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित असलेल्या जनहिताला हरताळ फासणारी कारकीर्द संपुष्टात आणून पश्चिम बंगालच्या मतदारांनी अखेर भाजपाच्या हाती सत्तेची सूत्रे देऊन अभूतपूर्व परिवर्तन घडविले. देशात गेल्या 12 वर्षांपासून सुरू झालेल्या परिवर्तन पर्वाचा हा एक तेजस्वी उत्तररंग आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील मतदार अभिनंदनास पात्र ठरतात.
प्रचंड संख्येने मतदानात सहभागी होऊन लोकशाहीच्या या उत्सवाचे पावित्र्य जपणाऱ्या मतदारांचा कौल त्यांच्या उत्साहातूनच उमटू लागला होता. त्यातून तृणमूल काँग्रेसमधील भयगंडाची लाट भाजपाच्या विजयाचे स्पष्ट संकेत देत होती. निकालानंतर भाजपा विजयाच्या उत्सवावर आरोपांची आणि नव्या-जुन्या कारणांची चिखलफेक करून विरोधकांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला, तरी भाजपाचा पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक दिग्विजय हा मतदारांच्या समंजसपणाचाच निःसंशय पुरावा आहे.
केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम या चार राज्यांच्या मतमोजणीतील सध्याचे कल हा भारतीय राजकारणातील बदलत्या प्रवाहांचा आरसा आहे. या निकालांकडे वेगवेगळ्या राज्यांच्या चौकटीत पाहणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांना एकत्रित समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. या चार राज्यांनी दिलेला संदेश बहुपदरी व गुंतागुंतीचा आहे. म्हणूनच तो अधिक बोलका आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा सत्तांतराचा कल स्पष्टपणे जाणवतो. संयुक्त लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी यांच्यातील ही पारंपरिक लढत आणि त्यातून दिले गेलेले सत्तांतराचे संकेत हे मतदारांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. सत्तेची सूत्रे कायम कोणाही एकाच हाती ठेवायची नाहीत, हा पायंडा केरळच्या मतदारांनी या निवडणुकीतही तंतोतंत पाळला. तामिळनाडूमधील कित्येक दशकांपासून दिसणारा द्रविडीयन राजकारणाचा प्रभाव आणि त्यामधून पोसले गेलेले द्विपक्षीय राजकारण यावेळी ढवळून निघाले आहे. अभिनेता विजय थलपतीचा तमिझगा वेत्री कझगम हा पक्ष या निवडणुकीत समर्थ राजकीय पर्याय म्हणून उभा राहिला आणि प्रस्थापित पक्षांना आव्हान देत त्याने बाजीदेखील मारली. या राज्यातील सत्तांतराचा हा प्रयोग नव्या पक्षाचा उदय तर आहेच. शिवाय, तो पर्यायाच्या शोधात असलेल्या मतदारांच्या मानसिकतेचा आणि इच्छाशक्तीचा पुरावा आहे. राज्यातील नवमतदार, शहरी वर्गाची सजगता आणि परिवारवादी पारंपरिक राजकारणाच्या विरोधात उमटू लागलेली उद्विग्नता यांचा हा परिणाम असावा.bjp victory आसाममध्ये मात्र स्थैर्याचा वेगळाच सूर ऐकू येतो. येथे भारतीय जनता पार्टीची ताकद निर्विवादपणे वाढत असून हा पक्ष तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. विकास, पायाभूत सुविधांची उभारणी आणि जनतेशी जोडलेले नाते या तीनही घटकांचा हा प्रभाव आहे.
पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूत बदलाची लाट असली, तरी आसामच्या जनतेने मात्र सातत्याला कौल देऊन विकासास प्राधान्य दिलेले दिसते. या चार राज्यांचे एकत्रित चित्र पाहिले, तर प्रादेशिक पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आणून राज्यांना केंद्रातील सत्तेशी जोडत विकासाचे भागीदार बनविण्याची मोदी सरकारची रणनीती मतदारांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते. देशाच्या सामाजिक मानसिकतेमध्ये होणारा बदल या निवडणुकांनी ठळकपणे अधोरेखित केला आहे. मतदार अधिक सजग, अधिक प्रयोगशील झाला असून विकास, नेतृत्व आणि राष्ट्रीय अस्मिता या तिन्ही घटकांचा संतुलित विचार करून तो आपला कौल देत आहे, हेदेखील या निकालांतून स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा आणि औत्सुक्याचा मुद्दा पश्चिम बंगालच्या निकालांभोवती केंद्रित झाला होता. या राज्याच्या राजकारणाचा प्रवास काँग्रेसच्या वर्चस्वापासून सुरू झाला. पुढे तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या दीर्घकालीन डाव्या सत्तेकडे झुकला आणि नंतर तृणमूल काँग्रेसच्या टप्प्यावर सुमारे 15 वर्षे स्थिरावला. भाजपाच्या विजयामुळे येथील राजकारण राष्ट्रीय दृष्टीने परिपक्वतेकडे जात असल्याचे दिसते. पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या तीन दशकांत काँग्रेसने राज्य केले. 1960 च्या दशकानंतर राजकीय अस्थिरता, नक्षलवादी चळवळ आणि प्रशासनातील ढासळलेली पकड यामुळे काँग्रेसचा प्रभाव कमी होत गेला. औद्योगिक घसरणीची बीजे याच काळात पेरली गेली आणि पुढील अनेक दशके ती राज्याची समस्या बनली. 1977 मध्ये सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीने पश्चिम बंगालच्या राजकारणाला नवा चेहरा दिला. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या हट्टापायी शेती क्षेत्रावर केंद्रित केलेल्या धोरणांमुळे उद्योगधंद्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. औद्योगिक विकास खुंटला. रोजगाराच्या संधी कमी झाल्याने तरुणाईत असंतोष वाढला आणि डाव्या सत्तेविरुद्ध तयार झालेल्या जनमताचा फायदा घेऊन परिवर्तनाचा नारा देत 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तांतर घडविणे शक्य झाले. ममता बॅनर्जी यांची धोरणे मोठ्या उद्योगांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरलीच. शिवाय, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचाराच्या आरोपांची मोठी काजळी ममता सरकारच्या कारकीर्दीवर उमटली. संतुलित विकासासाठी पश्चिम बंगाल भुकेला आहे, ही बाब नेमकी ओळखून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या विकासाची हमी दिल्याने मतदारांनी भाजपाला भरभरून कौल दिला आहे. विजयानंतरच्या आनंदोत्सवात सहभागी झालेल्या मतदारांनी त्याच अपेक्षांचा पुनरुच्चार केल्याने भाजपाला पश्चिम बंगालच्या विकासाचे स्वप्न साकारण्याचे आव्हान पेलावे लागेल. सत्ता बदलण्याचे काम मतदारांनी करून दाखविले आहे. विकासाचा स्थिर आणि सर्वसमावेशक मार्ग शोधण्याची जबाबदारी आता भाजपाची आहे. एका दृष्टीने पश्चिम बंगालमधील भाजपाचा ऐतिहासिक प्रवेश आणि अन्य राज्यांतील परिवर्तनाच्या लाटा पाहता, जनतेला पारंपरिक राजकारणाच्या विभ्रमातून बाहेर पडावयाचे आहे आणि योग्य व समर्थ पर्याय समोर आल्यास परिवर्तनाची संधी साधण्यासाठी समाज उत्सुकही आहे. विधानसभा निवडणुका हा आता केवळ त्या-त्या राज्यांच्या राजकीय विश्लेषणापुरता मर्यादित मुद्दा राहिलेला नाही. देशाच्या दीर्घकालीन राजकारणाचे व दिशेचे नवे संकेतही त्यामध्ये दडलेले आहेत.bjp victory भाजपाला मिळालेला संकेत स्पष्ट आहे. तो आश्वासक आणि आव्हानात्मकही आहे. काँग्रेस आणि परिवारवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना या कौलात स्वतःसाठी कोणते संकेत दिसतात आणि त्यांचा ते कसा अर्थ लावतात, यावर देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरेल.