वेध. . .
नितीन शिरसाट
lonar lake जागतिक दर्जाच्या लोणार सरोवरात होणारे बदल पाण्याची वाढ अशा वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी गेल्या महिन्यात खगोल दर्शन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहाच्या पृष्ठभूमीवर या महोत्सवात डार्क स्काय संकल्पनेने अंतर्गत दुर्बीणद्वारे तारे व ग्रह निरीक्षण, नक्षत्र दर्शन खगोलशास्त्रीय चर्चासत्रे झालीत; ज्यामुळे खगोल पर्यटनाला मोठी चालना मिळाली. उल्कापातामुळे निर्मित या अद्वितीय विवराचा अभ्यास करणे, प्रकाश प्रदूषणापासून मुक्त ठिकाणी आकाश दर्शन घडवणे, या परिसरात रात्रीचे आकाश स्वच्छ दिसण्यासाठी काही काळ सार्वजनिक विद्युत व्यवस्था बंद ठेवून डार्क स्काय अनुभव देण्यात आला. लोणारला डार्क स्काय साईटचा दर्जा मिळण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे; ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटक आकर्षित होतील. लोणार सरोवराची निर्मिती अंदाजे 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे झाली असून हे बेसॉल्ट खडकातील जगातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित हा महोत्सव पर्यटकांना अवकाशाचे विलोभनीय दर्शन घडविणारा ठरला आहे.
लोणारचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावा यासाठी येथे विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये एमटीडीसी पर्यटक निवास, पर्यटक अभ्यागत केंद्र, तारांगण, प्रयोगशाळा योग केंद्राचा समावेश आहे. लोणार खगोल दर्शन हा उपक्रम केवळ खगोलशास्त्रापुरता मर्यादित नसून तो पर्यावरणाशीही निगडित आहे. शाश्वत पर्यटनाला यामुळे नवी दिशा मिळेल. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील दख्खन बेसॉल्टच्या पठारावर उल्का आघाताने तयार झालेले हे विवर आहे. काहींच्या मते, यापूर्वी हे ज्वालामुखीच्या केंद्रीय उद्रेकातून तयार झाले असावे. मात्र हे नेमके केव्हा अस्तित्वात आले यावर अद्याप एकमत झालेले नाही. परंतु अलिकडील काळात झालेल्या संशोधनावरून अवकाशातून अतिवेगाने आलेल्या उल्केच्या आघातानेच असे प्रचंड आकाराचे विवर निर्माण होऊ शकते हे तेथील खडक, खनिजे व माती यांच्या नमुना चाचणी अभ्यासातून शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. लोणार सरोवर निर्मितीचा हा इतिहास असला तरी विवर निर्मितीचे दोन वैज्ञानिक प्रवाह आहेत.
सरोवराची निर्मिती ज्वालामुखीच्या केंद्रीय मुखाने झाली असा सिद्धांत 1911 मध्ये लिहिलेल्या शोधनिबंधात टुशे व ख्रिस्ती यांनी केला आहे. त्यांनी 1840 ते 1910 पर्यंत सर्व शोधनिबंधांचा अभ्यास करून त्याचा आढावा घेतला, परंतु त्यानंतर झिग्रन व राव (1954), नंदी व देव (1961), बडवे व कुमारन (1992) यांनी भूशास्त्रीय, भूवैज्ञानिक व रासायनिक अभ्यास केला. त्यांनी विवर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच झाले हे स्पष्ट केले. यातील वनस्पती मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड सोडतात. तो वायू पाण्यात विरघळतो व आम्ल तयार होते. त्याचे हायड्रोजन सल्फाईड्सवर कार्य होऊन सल्फाईड वायू तयार होतो. याच प्रक्रियेतून आम्लारी क्षार तयार होतात. ही क्रिया प्रकाश संश्लेषणेद्वारा होते. त्यामुळेच पाणी अजूनही खारटपणा सोडत नाही, असे संशोधकांचे मत आहे. सरोवराचे पाणी पिण्याला अयोग्य असले तरी त्यात स्नान केल्यावर त्वचेचे अनेक आजार बरे होतात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या पाण्यापासून साबण तयार होते. ती स्नानासाठी चांगली असते असेही काहींचे म्हणणे आहे. याचा पुरावा इतिहासात सापडतो. सरोवराची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे गेल्या दोन वर्षांत झालेल्या अवकाळी पावसामुळे सरोवराची पातळी लक्षणीय वाढली आहे. हवामान बदलामुळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरोवरात अतिरिक्त पाणी जमा झाले. भूजल पातळीत जाण्याचे मार्ग बंद झाल्याने पाणी साचून राहत आहे. लोणार विकास आराखड्यांतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने तरतूद केली आहे.lonar lake या वर्षाकरिता अंदाजे 2.21 कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण 150.83 कोटी रुपयांचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या निधीतून लोणार सरोवर परिसरात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरण, ऐतिहासिक मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून लोणारच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे काम केले जात आहे. उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर हे राज्यातील महत्त्वाचे नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ विकासाला गती देण्यासाठी सर्व कामे निर्धारित कालावधीत व उच्च दर्जाने पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त व जिल्हाधिकाèयांनी वन विभाग, नगर परिषद तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
9881717828