‘एकच वादा अजितदादा’, आता फक्त आठवणींचा गाजावाजा

रेकॉर्डब्रेक मताधिक्क्य, तरीही बारामतीत शुकशुकाट

    दिनांक :05-May-2026
Total Views |
बारामती,
baramati-bypoll-election-2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक आणि विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळवला. या विजयामुळे बारामतीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या राजकीय नकाशावर ठळकपणे चर्चेत आले. मात्र या मोठ्या विजयानंतरही अपेक्षित असा जल्लोष पाहायला मिळाला नाही.
 
 

baramati-bypoll-election-2026 
 
 
मतमोजणी सकाळी सुरू झाली आणि प्रत्येक फेरीसोबत सुनेत्रा पवार यांचे मताधिक्क्य वाढत गेले. एकूण २४ फेऱ्यांनंतर त्यांचा विजय स्पष्ट झाला आणि त्यांनी रेकॉर्डब्रेक मतांनी बाजी मारली. तरीही बारामतीत नेहमी दिसणारा उत्साह, गुलाल, जेसीबीने होणारा जल्लोष यावेळी दिसून आला नाही.
 
बारामतीकरांनी या वेळी शांततेतच निकाल स्वीकारला. अनेक ठिकाणी लोकांनी फक्त सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केला. काहींनी दिवंगत नेते अजित पवार यांचे फोटो शेअर करत भावनिक पोस्ट केल्या, तर काहींनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करत मौन आनंद व्यक्त केला.
 
या विजयाला भावनिक किनार असल्याचेही दिसून आले. काही नेत्यांनी सांगितले की, हा विजय केवळ राजकीय नसून, अजित पवार यांच्या कार्याला दिलेली आदरांजली आहे. त्यामुळे आनंद असूनही बारामतीत सणासारखा जल्लोष टाळण्यात आला. एकूणच, बारामतीत रेकॉर्डब्रेक विजय मिळूनही यंदा आनंदापेक्षा भावना आणि शांततेचे वातावरण जास्त जाणवले.