आयपीएल फायनलवर वादाचे ढग!

अंतिम सामना दुसऱ्या शहरात हलवण्याची शक्यता

    दिनांक :05-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Controversy over IPL final आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नसल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. मागील काही वर्षांच्या परंपरेनुसार गतविजेत्या संघाच्या शहरात अंतिम सामना आयोजित केला जातो. त्यानुसार यंदा बंगळुरू येथे सामना होणे अपेक्षित होते, कारण मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद मिळवले होते.मात्र कर्नाटकमधील तिकीटवाटपाशी संबंधित वादामुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही लोकप्रतिनिधींनी सामन्यांसाठी मोफत तिकिटे आणि विशेष प्रवेश सुविधा मिळावी अशी मागणी केल्याने हा वाद अधिक वाढला आहे. या मागणीला काही राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने स्टेडियम व्यवस्थापन आणि राज्य क्रिकेट संघटनेवरही टीका होत आहे.
 
 

chinnaswamy 
या संपूर्ण प्रकरणामुळे सामान्य प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक चाहत्यांनी तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, तर काही लोकप्रतिनिधींना विशेष सवलत दिली जात असल्याचा आरोप होत आहे. यावरून समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर तडजोडीचा एक प्रयत्न करण्यात आला असून काही प्रमाणात तिकीट वितरणाबाबत तोडगा काढण्यात आला आहे. तरीही वाद पूर्णपणे शमलेला नाही.या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अंतिम आणि प्ले ऑफ सामन्यांचे ठिकाण बदलण्याचा विचार करत असल्याचे समजते. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर अंतिम सामना बंगळुरूऐवजी दुसऱ्या शहरात हलवला जाऊ शकतो, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याबाबतची अनिश्चितता अद्याप कायम आहे.