रांची,
IAS Anil Tuteja granted bail झारखंड दारू घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनिल तुतेजा यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर धोरणात बदल करून काही निवडक कंत्राटदारांना फायदा मिळवून देत कोट्यवधी रुपयांचे कमिशन मिळवल्याचा गंभीर आरोप आहे. न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या असून ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रासोबत दोन सक्षम हमीदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तपास प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करणे आणि कोणत्याही साक्षीदारावर दबाव न आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. तपासात अडथळा निर्माण झाल्यास जामीन रद्द करण्याची मुभा तपास यंत्रणेला देण्यात आली आहे.
या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि फसवणुकीसंबंधी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपांनुसार, काही अधिकाऱ्यांनी मिळून एक गट तयार करून दारू उत्पादन व वितरण धोरणात बदल केला आणि त्यातून अवैध आर्थिक फायदा उचलला.सरकारी बाजूने असा आरोप करण्यात आला आहे की, हा संपूर्ण प्रकार योजनाबद्ध पद्धतीने राबवण्यात आला असून राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. काही बैठका घेऊन ठरावीक कंत्राटदारांना लाभ देण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तर दुसरीकडे, आरोपी अधिकाऱ्याने हे सर्व आरोप नाकारले असून आपल्याविरुद्ध राजकीय आणि प्रशासकीय कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या तपासांमध्ये कोणतीही ठोस मालमत्ता किंवा थेट आर्थिक पुरावे सापडले नसल्याचेही त्यांच्या बाजूने सांगितले जात आहे.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन अटींच्या अधीन राहून पुढील कारवाई केली जाणार आहे.