कूपर कॉनोलीचे शतक व्यर्थ; सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय!

    दिनांक :07-May-2026
Total Views |
हैदराबाद ,
srh-vs-pbks : इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामातील ४९वा साखळी सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला, ज्यात हैदराबादने ३३ धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. क्लासेनने ६९ धावांची शानदार खेळी केली, तर इशान किशनने ५५ धावा केल्या. पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
 
 
 
 
srh
 
 
लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली, त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज, प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग, ४ धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या ५ धावांवर बाद झाला. तिथून पुढे, कूपर कॉनलीने धावगती कायम ठेवण्याचा प्रयत्न करत डाव सावरला, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. कॉनलीची ५९ चेंडूंतील नाबाद १०७ धावांची खेळी उत्कृष्ट ठरली, पण तो पंजाब किंग्सला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाब किंग्स २० षटकांत ७ गडी गमावून केवळ २०२ धावाच करू शकला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि शिवांग कुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर नितीश कुमार रेड्डी, इशान मलिंगा आणि शकिब हुसेन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.