दहावीतही मुलींचीच सरशी:जिल्ह्याचा निकाल ९०.७४ टक्के

अमरावती विभागात दुसरा क्रमांक; गतवर्षीपेक्षा निकाला सुधारणा

    दिनांक :08-May-2026
Total Views |
अकोला,
10th-class-result-akola : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी,८ रोजी ऑनलाइन जाहीर झाला.विभागात दुसरे स्थान मिळवत जिल्ह्याचा निकाल ९०.७४% एवढा लागला आहे. यामध्ये मुलींच्या पास होण्याची टक्केवारी ९४.९४ तर मुलांची टक्केवारी ८६.९६ टक्के एवढी आहे त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या निकालात मुलींचीच सरशी पाहायला मिळाली.
 
 
akola
 
 
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यातून एकूण २५ हजार ६८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी २५ हजार ४१६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गेल्या वर्षी दहावीचा जिल्ह्याचा निकाल ८९.३५ टक्क्यांपर्यंत खाली आला होता त्यामुळे जिल्हा विभागात शेवटच्या स्थानावर होता. मात्र, यंदा त्यात सुधारणा होऊन जिल्ह्याचा निकाल ९०.७४ टक्के नोंदवला आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्याने ९३.९५ टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला.तर अकोला ९०.७४ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी, अमरावती जिल्हा ९०.०६ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी असून, यवतमाळचा निकाल ८८.३८ टक्के तर वाशीम जिल्ह्याचा ८८.०४ टक्के एवढा लागला आहे.
 
 
निकालात पातुर ची बाजी अकोट सर्वात कमी
 
तालुकानिहाय निकालात पातूर तालुक्याने ९४.२५ टक्के निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अकोला तालुका ९२.०५ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर असून, बाळापूरचा निकाल ९०.७५ टक्के लागला आहे. तेल्हारा ८९.५८, अकोट ८८.७८, बार्शीटाकळी ८६.१२, आणि मूर्तीजापूर ९०.२५ या तालुक्यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे.
 
 
पुनर्मूल्यांकन व गुणपडताळणीची सुविधा
 
निकालानंतर गुणांबाबत समाधान नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत शनिवार, दि.९ मे ते २३ मे २०२६ पर्यंत असणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागणार आहे.