नवी दिल्ली,
Fixing in IPL? इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा सामनानिश्चितीच्या चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाकडून एक गोपनीय अहवाल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या अहवालात काही संघांच्या आसपास संशयास्पद हालचाली आणि अनोळखी व्यक्तींची वाढती वर्दळ याबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, काही अनोळखी व्यक्ती संघांच्या विश्रांती कक्षाजवळ, संघाच्या बसमध्ये तसेच खेळाडू राहत असलेल्या हॉटेल परिसरात दिसून आल्या आहेत. या हालचालींवर भ्रष्टाचारविरोधी विभाग बारकाईने लक्ष ठेवून असून काही खेळाडूंना लक्ष्य केले जात असल्याची शक्यताही तपासली जात आहे. विशेषतः काही महिला खेळाडूंसोबत वारंवार दिसत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे खेळाडूंसोबत येणाऱ्या व्यक्तींवरील नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
स्पर्धेचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या घडामोडींना दुजोरा देत मंडळ या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. स्पर्धेची प्रतिमा आणि विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी सर्व संघांना लवकरच नव्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मंडळाचे सचिव देवजित सैकिया यांनीही काही संघांकडून नियमभंग झाल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संघांचे मालक आणि अधिकारी परवानगी नसलेल्या ठिकाणी खेळाडूंशी संपर्क साधताना आढळले आहेत. त्यामुळे स्पर्धेदरम्यान सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता मंडळाने व्यक्त केली आहे. लवकरच सर्व संघांसाठी कठोर आचारसंहिता लागू केली जाणार असून तिचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.