अनिल कांबळे,
नागपूर,
lover-sets-wedding-tent-on-fire : दाेन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर कुटुंबियांनी लग्नास विराेध करीत तिचे दुसरीकडे लग्न ठरविले. चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या लग्नाचा मंडप पेटवला. तिच्या आईवडिलांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. लग्नघरी आलेल्या पाहुण्यांनी प्रसंगावधान राखून मंडपाची आग विझवल्याने माेठा अनर्थ टळला. मानकापूर पाेलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे त्या तरुणीचे लग्न सुरळीतपणे पार पडले. या प्रकरणी मानकापूर पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकराला अटक केली. मात्र, या घटनेमुळे लग्नमंडपात माेठा गाेंधळ उडाला हाेता. सायमंड (23, मार्टिननगर) असे आराेपीचे नाव आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमंड हा तीन वर्षांपूर्वी मानकापूर वस्तीत राहत हाेता. त्यावेळी वस्तीत राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणी सीमरनच्या (बदललेले नाव) कुटुंबियांशी त्याची ओळख झाली. त्यामुळे त्याचे त्या तरुणीच्या घरी येणे-जाणे वाढले. यादरम्यान, सीमरनशी त्याचे सूत जुळले. दाेघांच्या भेटी वाढल्या आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. दाेघांच्याही प्रेमाची कुणकुण कुटुंबियांना लागली. सीमरनच्या वडिलांनी सायमंडची समजूत घातली. त्यामुळे दाेघांची ताटातूट झाली. मात्र, काही महिन्यांनतर दाेघांनी एकमेकांचा विरह सहन झाला नाही. दाेघे पुन्हा एकत्र आले. दाेघांनी कुटुंबियांच्या विराेधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्या चाेरुन-लपून दाेघांच्या भेटी व्हायला लागल्या.
अचानक ठरले लग्न
सीमरनचे वाढते प्रेम लक्षात घेता तिच्या कुटुंबियांनी झटपट नातेवाईक असलेल्या मुलाचे स्थळ बघितले आणि थेट लग्न ठरवले. सीमरनला घरातून बाहेर पडण्यास संधीच न मिळाल्यामुळे लग्न ताेंडावर आले आणि लग्नाची पूर्ण तयारी झाली. प्रेयसीच्या लग्नाची माहिती सायमंडला कळली. त्याने लगेच दुचाकीने सीमरनचे घर गाठले. तिच्या घरासमाेर लग्नाचा मंडप दिसताच त्याने शिविगाळ आणि गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. लग्नघरी उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
लग्नाच्या मंडपाला लावली आग
सायमंडने प्रेयसीच्या वडिलांना ‘तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या मुलासाेबत लग्न कसे ठरविले,’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने बाॅटलमधील पेट्राेल लग्नाच्या मंडपावर शिपडले आणि आग लावली. त्यामुळे खळबळ उडाली. पाहुण्यांनी प्रसंगावधान राखत मंडपाची आग पाणी फेकून विझवली.
पाेलिसांनी तत्परता
या घटनेची माहिती मानकापूरचे ठाणेदार हरिष कलसेकर यांना मिळाली. त्यांनी लगेच लग्नमंडपात पाेलिस पथक पाठवले. पाेलिसांनी सायमंडला ताब्यात घेतले. वधुपित्याला पाेलिसांनी विश्वास दर्शविला. सायमंडवर पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याला चांगला प्रसाद दिला. त्यामुळे सीमरनेच धुमधडाक्यात लग्न लागले. नागरिकांनी पाेलिसांवर दाखवलेला विश्वास मानकापूर पाेलिसांनी सार्थ ठरविला.