ज्येष्ठांना आनंदाने जगण्याचा मार्ग सुकर होणार : डॉ. भोयर
*ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा
दिनांक :09-May-2026
Total Views |
वर्धा,
dr bhoyar शासनाच्यावतीने लोककल्याणकारी योजना व उपक्रम राबविताना ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्याच्या उतरत्या वयात आनंद व समाधानाने जगता यावे, यासाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या विचाराचे एकमेकांसोबत आदानप्रदान होऊन आनंदाने जगण्याचा मार्ग सुकर होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
लहरीनगर, नालवाडी येथे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार माया इवनाथे, आ. सुधीर मुनगंटीवार, माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे, माजी खा. रामदास तडस, संजय गाते, वैशाली येरावार आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नियोजन समितीच्या निधीतून या केंद्राचे बांधकाम केले आहे.
जिल्ह्यात २०१४ पर्यंत केवळ एकच राष्ट्रीय महामार्ग होता. आज जिल्ह्यामध्ये १३ राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले असून जिल्ह्यात या महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. शासन प्रत्येक नागरिकास केंद्रबिंदू माणून काम करीत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन काम करीत आहे. आदिवासींच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे खा. माया इवनाथे यांनी सांगितले.
अटलजींच्या विचाराची व कार्याची ओळख ठेऊन विरंगुळा केंद्राला श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विरंगुळा केंद्र नाव देण्यात आले, ही गौरवाची बाब आहे. अटलजींचे व्यतिमत्व व स्वाभिमान ही त्यांची ओळख होती. संयुत राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण देणारे पहिले अटलजी होते. लोकशाहीनिष्ठ व प्रतिभाषी असलेल्या अटलजींच्या नेतृत्त्वात तीन स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. त्यांचे योगदान राष्ट्रसाठी मोठे आहे, असे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले.
यावेळी रामदास तडस यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. संचालन पल्लवी पुरोहित तर आभार नालवाडी ग्रापंचे प्रशासक रविंद्र राठोड यांनी मानले.