अमरावती,
amravati-congress-candidate : अमरावती विधान परिषद निवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी १५ ते २० कोटी घेतल्याची चर्चा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व सदर निवडणुकीच्या पक्षाच्या निरीक्षक यशोमती ठाकूर यांनीच केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण निवडणूक ’मॅनेज’ करण्यात आल्याचा संशय त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे.

गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेले काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख हे सध्या नागपूरमधील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यशोमती पुढे म्हणाल्या, हर्षजीत देशमुख हे आयसीयूमध्ये दाखल असतानाही माध्यमांशी सहज संवाद साधत आहेत. जर त्यांची तब्येत इतकी खालावली आहे तर ते बोलू कसे शकतात? या संपूर्ण प्रकाराबाबत अनेक शंका आहेत. यामागे खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. या घोडेबाजारवरून त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोट्यवधी रुपयांची रोकड आणि एवढी मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असताना प्रशासनाने आणि गृह विभागाने काय कारवाई केली? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय असे विचारले असता त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या संदर्भात जे काही निर्णय घेतील आणि जे निर्देश देतील, त्यानुसारच पक्षाची पुढील रणनीती आणि भूमिका ठरवली जाईल.
वंचितला पाठिंबा देणार?
काँग्रेसच्या उमेदवाराचे असे संशयास्पद वर्तन पुढे आल्यामुळे महाविकास आघाडीत नव्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना अधिकृत पाठिंबा देणार का? याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.
उमेदवार नागपुरात घेत आहे उपचार
काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांची ९ जून रोजी अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना नागपूर येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी स्वतः प्रकृतीविषयी माध्यमांना सांगितले की, मला दम लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अँजिओग्राफी करण्यात आली असून डॉक्टरांनी मला चार ते पाच दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आणखी दोन दिवस निरीक्षणाखाली राहण्यास सांगितले आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष प्रकृती सुधारण्याकडे आहे. निवडणुकीचा प्रचार करण्याची इच्छा मी डॉक्टरांकडे व्यक्त केली होती, मात्र त्यांनी मला सध्या प्रचारासाठी परवानगी दिलेली नाही. तरीही दोन दिवसांत अमरावतीला जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.