मुंबई,
Ek Ped Maa Ke Naam नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच राज्यातील विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धनाचीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एक पेड माँ के नाम 3.0’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राला सन २०२६-२७ साठी तब्बल ५३ लाख १ हजार २५७ झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्याच्या पूर्ततेसाठी राज्यातील प्रत्येक शाळेला किमान ५० झाडे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत शाळांमधील इको क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धनाचे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांची नियमित देखभाल, संगोपन आणि वाढीचे निरीक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अनेक शाळांच्या आवारात Ek Ped Maa Ke Naam वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याची बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने लवचिक भूमिका घेतली आहे. ज्या शाळांकडे जागेची कमतरता आहे, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वतःच्या घराच्या परिसरात, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक जागांमध्ये किंवा शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. या मोहिमेत स्थानिक नागरिक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग वाढवून उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
‘ग्रीन समर कॅम्प’चे आयोजन
वृक्षारोपण मोहिमेसोबतच शाळांमध्ये ५ ते ३० जून या कालावधीत ‘ग्रीन समर कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमधून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली, शाश्वत अन्नप्रणाली, ई-कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व पाणी बचत तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापराविरोधातील जनजागृती यांसारख्या विषयांची माहिती दिली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जाणार आहे.
दरम्यान, संपूर्ण मोहिमेचे प्रभावी निरीक्षण आणि वृक्षारोपणाची अचूक नोंद ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. सर्व शाळांनी वृक्षारोपणासंदर्भातील माहिती, छायाचित्रे आणि उपक्रमांचा तपशील या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ झाडांची संख्या पूर्ण करण्यापेक्षा लावलेली रोपे दीर्घकाळ जिवंत राहून त्यांचे संवर्धन व्हावे, यावर विशेष भर देण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या या व्यापक मोहिमेमुळे भविष्यात हरित महाराष्ट्र घडविण्यास हातभार लागेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.